विनामीटर धावताहेत रिक्षा; प्रवाशांची लूट, अहिल्यानगरमध्ये प्रवाशांमधून संताप

अहिल्यानगर शहरातील रिक्षा प्रवास आजही जुन्याच पद्धतीने सुरू आहे. रिक्षांमध्ये मीटर बसवणे आणि दरपत्रकानुसार प्रवाशांकडून भाडे घेणे, हे इतर शहरांत नियमाने होत असतानाही अहिल्यानगर शहरात ही व्यवस्था आजतागायत लागू झालेली नाही. परिणामी मनमानी भाडे आकारून लुटले जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांत 1960-70 च्या दशकातच रिक्षांना मीटर लावण्याची सक्ती करण्यात आली. कालांतराने जीपीएस आधारित डिजिटल मीटर आणि ऍप-आधारित भाडेप्रणाली लागू झाली. मात्र, अहिल्यानगर शहरात अशा कोणत्याही तांत्रिक सुविधा अद्यापि आलेल्या नाहीत.

शहरातील रिक्षाचालक ठराविक भाडेदर न घेता, प्रवाशांच्या गरजेचा आणि वेळेचा गैरफायदा घेतात. उदाहरणार्थ दोन किलोमीटरच्या अंतराला पंधरा ते वीस रुपये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तीस ते चाळीस रुपये आकारले जातात. पावासाळा, सुट्टीचे दिवस आणि रात्रीच्या वेळी दरांमध्ये आणखी वाढ होते.

मुंबईत मीटर नसलेल्या रिक्षाला रस्त्यावर चालवण्यास परवानगी नाही. पुण्यातही डिजिटल मीटर व दरपत्रक काटेकोरपणे पाळले जाते. नागपुरात जीपीएस-मीटरची चाचणी यशस्वी ठरली असून, त्याद्वारे प्रवासाचा रेकॉर्ड सुरक्षित राहतो. याउलट अहिल्यानगर शहरात प्रवाशांना कोणताही हक्क सांगता येत नाही, कारण अधिकृत मीटरच नाही.

शहरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवासी संघटनांनी मीटर यंत्रणा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. दरपत्रक जाहीर करून जीपीएस-आधारित डिजिटल मीटर लावले, तर लूटमार थांबेल आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता येईल, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

प्रशासनाची निक्रियता
वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, प्रस्ताव मांडले; पण अंमलबजावणी मात्र शून्य. काही वर्षांपूर्वी मीटर लावण्याची घोषणा झाली होती; परंतु पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही.

सुरक्षा व पारदर्शकतेचा प्रश्न
मीटर नसल्यामुळे दर ठरवताना रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात वाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. बाहेरील प्रवाशांना तर योग्य भाडय़ाची कल्पना नसल्याने ते दुप्पट पैसे देतात. अशा वादातून अनेकदा धक्काबुक्की, भांडणं, अगदी मारहाणीपर्यंत प्रकरणं जातात.