मला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचंय, पण आताच नाही! रिकी पॉण्टिंगची शर्यतीतून माघार

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्यासाठी जाहिरात सोडली आहे. हिंदुस्थानच्या गौतम गंभीरसह ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉण्टिंग व न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग ही नाव सध्या चर्चेत आहेत. ‘हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी ‘बीसीसीआय’ने आपल्याशी संपर्क साधला होता. टीम इंडियासारख्या संघाचे प्रशिक्षक होण्यास कोणाला आवडणार नाही. मात्र ती जबाबदारी स्वीकारण्याची ही नक्कीच योग्य वेळ नाही,’ असे सांगत पॉण्टिंगने प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे म्हणजे आयपीएल फायनलच्या दुसऱया दिवसापर्यंत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पॉण्टिंगने सांगितले की, मला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे, पण सध्या दिल्ली पॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी असल्याने आणि ऑस्ट्रेलियातील संबंधित काम पाहता ही भूमिका स्वीकारणे योग्य वाटत नाही. हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक झाल्यास आयपीएलमध्ये प्रशिक्षक होता येत नाही. मी सध्या ज्या प्रकारचे जीवन जगतो ते लक्षात घेता ही भूमिका माझ्या जीवनशैलीत बसत नाही.’

‘माझा धाकटा मुलगा फ्लेचर म्हणतो, डॅडी तुम्ही टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हा. पुढील काही वर्षांसाठी मला हिंदुस्थानात राहायला आवडेल. माझे कुटुंबीय हिंदुस्थानवर आणि इथल्या क्रिकेटवर खूप प्रेम करतात, मात्र सध्याच्या घडीला ही ऑफर स्वीकारणे माझ्यासाठी अवघड आहे.’ – रिकी पॉण्टिंग