उखाणे, आन्हे आणि कूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. संजय बोरुडे

परंपरेने चालत आलेल्या लोकजीवनामध्ये जे साहित्य वाङ्मय तयार होते त्यात लोकगीते, लोककथा, दैवतकथा, अशा अनेक बाबींचा समावेश होतो. अशा लोकश्रद्धा, रुढी, प्रथा यांचा वेध घेणारे सदर.

उखाणा हा फक्त लग्नात नाव घेण्यापुरताच असतो असे नाही. लोकसाहित्यातील उखाणा अनेक प्रकारांनी समृद्ध असा आहे. कधी थट्टामस्करी करून तर कधी समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीला चालना देऊन मती गुंग करून टाकतो. असा हा उखाणा हसत खेळत ज्ञान देण्याच्या गुणधर्मामुळे लोकप्रिय झालेला आहे.

पाऊस नाही, पाणी नाही, रान कसे हिरवे?
कात नाही, चुना नाही, तोंड कसे रंगले?

अशा प्रकारच्या उखाण्याला ‘आहणा’, ‘आयना’ किंवा ‘आन्हा’ असा शब्द आहे. एक जण उखाण्यातून कोडे घालतो किंवा आन्हा घालतो आणि ऐकणाऱयांनी तो जितायचा असतो. म्हणजे बरोबर उत्तर द्यायचे असते. जो बरोबर उत्तर देईल, त्याने पुढचा आन्हा घालायचा असतो. वरील आह्याचे उत्तर ‘पोपट’ असे आहे.

त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारातील गणिती सूत्रे, कसोटय़ा आणि व्यवहारचातुर्य यांचे प्रकटन ज्या कोडय़ांमधून केले जाते त्याला कूट असे म्हणतात. कलगी आणि तुऱयाची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यात दोघांच्या मध्ये सवाल-जवाब यांची जुगलबंदी चालू असते, त्यामध्येसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे कूटप्रश्न एकमेकांना घालण्याची पद्धत आहे. जुन्या मराठी तमाशापटांमध्ये सवाल-जवाब सादर करताना अशा पद्धतीची कूटे घातलेली दिसतात.

लग्नात घेतले जाणारे उखाणे

खरं तर उखाण्यातून पतीचे अथवा पत्नीचे नाव घेण्याची कला सर्वांनाच जमते असे नाही. एका ओळीपासून तीस-चाळीस ओळींपर्यंत लांबलचक उखाणा घेतला जातो. लग्नातल्या उखाण्यांमधून सासर-माहेरची नाती, सण, नवऱया-बायकोचे वर्णन, चालीरीती, रूढी, परंपरा आणि अलीकडे इतिहास, भूगोलाचे यमक जुळवतसुद्धा उखाणे घेतले जातात.

लग्नात रुखवताच्या उखाण्यांचीही पद्धत आहे. लग्नात जो रुखवत मांडला जातो त्यात पापडय़ा, कुरडय़ा, शोभेच्या वस्तू, भरतकाम, विणकाम, पेंटिंग्ज आदी वस्तू ठेवतात. मेहुण्याचे नाते असणारे स्त्र्ााr-पुरुष एकमेकांच्या डोक्यात कुरडय़ा-पापडय़ा फोडताना दिसतात. विहिणींच्या लटक्या खोडी, उखाळ्या पाखाळ्या चालू असतात. त्यात एकमेकींवर कुरघोडय़ा करण्यासाठी वऱहाडाचे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसतात. एकमेकांची उणीदुणी काढताना हे गमती जमतीचे उखाणे वापरतात.

आला आला रुखवत वाजत गाजत,
आत उघडून बघती तर बदामाचं ताट
दोनशे खांडवा कापण्या तीनशे साठ
दुसऱया दुरडीत गुलालाचा भार,
व्याही केला हौसेदार,
तिसऱया दुरडीत हळदीकुंकवाचे पुडे,
रुखवत उघडते आयाबायांच्या पुढे

फुगडय़ांचे उखाणे

फुगडय़ा खेळताना दमायला होऊ नये तसेच फुगडय़ा मनोरंजक व्हाव्यात म्हणून हे उखाणे वापरतात. यातही एक प्रकारची चढाओढ असते.
फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी
माझ्याशी फुगडी खेळते लेकुरवाळी
लाही बाई लाही साळीची लाही
मुक्यानं फुगडी खेळणं शोभत नाही
खार बाई खार लोणच्याचा खार
माझ्याशी फुगडी खेळते नाजूक नार

आन्हे

आह्यांमध्ये उत्तर गोपनीय असते. बऱयाचदा ते एखाद्या वस्तूचे, प्राण्याचे किवा परिचित गोष्टीचे नाव असते. तिथपर्यंत जाता यावे असे सूचक वर्णन असते. त्यात यमक किंवा प्रास असतो. चटकन लक्षात राहील असा चुरचुरीतपणा त्यात असतो. कधी कधी अश्लील वाटणारे वर्णन, उपमाही असते.
आटक्यात लोटकं लोटक्यात दही
बारा कोस जाई पण सांडत नाही… (नारळ)

एका शब्दाचे उखाणे

यात एक किंवा दोन शब्दांत गोपनाचे वैशिष्टय़ दिलेले असते आणि उत्तर शोधायचे असते.
1. वैरणीत बा ..?(कडबा)
2. जेवणात डू ..? (लाडू)
3. पाचदार ..? (पावा किंवा बासरी )
4. दुधावरचा फेस…? (लोणी)
5. वळचणीचा खवा..? (केस)

कूट

याखेरीज उखाण्यांमध्ये कूट हा प्रकार असतो. भेदिक परंपरेमध्ये आणि सवाल-जवाबमध्ये कूट घालणे आणि ते सोडवणे असा एक प्रकार असतो.
(सवाल)ः भिडेल त्याचा पडेल तुकडा
असा धर्म गं बाणाचा
नेम साधता जीव जोडतो
असा बाण गं कोणाचा?
(जवाब)ः भिडेल त्याला समूळ छेदील
असा बाण गं रामाचा एएएए
अन् नेम साधता जीव जोडतो
असा बाण गं कामाचा!

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]