
इंग्लंड दौऱयावर असलेल्या ‘टीम इंडिया’तील खेळाडूंना दिलेली 20 दिवसांची सुट्टी चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसह एका सपोर्ट स्टाफलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच संपर्कात आलेला दुसरा यष्टिरक्षक रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ‘टीम इंडिया’त कोरोनाचा शिरकाव झाल्याने संघाची घडी विस्कळीत झाली असून त्याचा कामगिरीवर परिणाम होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
हिंदुस्थानी क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफ 20 दिवसांची सुट्टी संपवून गुरुवारी डरहॅममध्ये बायो-बबलमध्ये परतले. मात्र दुर्दैवाने काही खेळाडू अन् सपोर्ट स्टाफमधील काहींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वेगळे क्वारंटाईन व्हावे लागले. थ्रो-डाऊन एक्सपर्ट दयानंद गरानी यांची गुरुवारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दयानंद गरानी यांच्या संपर्कात आल्याने रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांनाही विलगीकरणात रहावे लागले आहे. रिषभ पंत, रिद्धीमान साहा यांच्यासह सपोर्ट स्टाफ यांना बायो-बबलमध्ये पाठविता आले नाही. बुधवारी, मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची कोलकात्यात भेट घेतली. पण या बैठकीत झालेल्या चर्चेची कोणतीही माहिती त्यांनी बाहेर येऊ दिली नाही.
पंतसोबत एक खेळाडूही पॉझिटिव्ह
रिषभ पंतसोबत आणखी एका खेळाडूलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र सुदैवाने त्याचा 10 जुलैला दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पंतची 18 जुलैला दुसरी टेस्ट होणार आहे. रिषभ पंतला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली. दरम्यान, रिषभ पंतच्या संपका&त आलेल्या इतर खेळाडू आणि कर्मचाऱयांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. रिषभ पंतमध्ये आता कोरोनाची लक्षणे नाहीत. ‘टीम इंडिया’ला 20 जुलैपासून सराव सामने खेळायचे आहेत.
…तरीही ‘बीसीसीआय’कडून दुर्लक्ष
रिषभ पंतला 10 जुलैला कोरोना झाल्याचे समोर आले. तो 29 जूनला युरो चषक स्पर्धेतील इंग्लंड-जर्मनी दरम्यानचा सामना बघायला गेला होता. पंतसह हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील हा फुटबॉल सामना बघायला गेले होते. मात्र रिषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ‘बीसीसीआय’ने त्याकडे दुर्लक्ष करीत खेळाडूंची सुट्टी रद्द केली नाही. ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवि शास्त्री 11 जुलैला विम्बल्डन फायनल बघायला गेले. याच वेळी ‘टीम इंडिया’तील इतर क्रिकेटपटूही कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये फिरत होते. गाफील राहिल्यामुळे ‘टीम इंडिया’मध्ये कोरोनाने सहज शिरकाव केला.




























































