निर्वासितांचे लोंढे थांबवण्यासाठी इंग्लंड कायदा आणणार, व्हिसा-पासपोर्टशिवाय येणाऱ्यांना हद्दीवरच अडवणार

ब्रिटनमध्ये स्थलांतरितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे आपल्याच राजकिय पक्षात वाळीत पडल्यासारखी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष एकसंध ठेवण्यासाठी तसेच इमिग्रेशनच्या मुद्द्यांवर उजव्या विचारसरणीच्या गटांना बंडखोरी करण्यापासून रोखण्यासाठी सुनक यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी गुरुवारी सुनक सरकारने नवीन कायदा अमलात आणला आहे.

नवीन कायद्यानुसार ब्रिटनमध्ये व्हिसा – पासपोर्टशिवाय सागरी मार्गाने बेकायदेशीररित्या येणाऱ्या स्थलांतरितांना रोखणार आहे. ऋषि सुनक यांनी ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नव्याने लागू केलेल्या नियमाबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर व्यवस्थेचा गैरवापर करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

नव्या कायद्यानुसार ब्रिटनला जाणारे कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तिंना स्व:त सोबत कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सोबत नेण्याची परवानगी नसेल. याशिवाय व्यवसायांसाठी दिली जाणारी 20% सुट देखील आता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गत वर्षात सात लाखांहून अधिक लोकांनी स्थलांतरन केले आहे. त्यामुळे आता नवीन कायद्यानुसार स्थलांतराचे प्रमाण तीन लाखांपर्यत आणण्याचे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे.

बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ऋषी सुनक यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ब्रिटन सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक लोक निराश होतील. यावर बऱ्याच टीका देखील करण्यात येतील. मात्र अवैध स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सुनक यांनी सांगितले आहे. पुढे, मी देखील एका स्थलांतरित झालेल्या जोडप्याचे मूल आहे, मात्र माझे कुटुंब येथे कायदेशीररित्या आले आहे. इथे येणाऱ्या लोकांच्या भावना मी समजतो. ब्रिटन हा एक अद्भुत देश आहे. येथे लोकांना संधी मिळते, हा देश लोकांना सुरक्षा प्रदान करतो. पण बेकायदेशीर प्रवेशामुळे केवळ सीमा सुरक्षा कमकुवत होत नसून नि:पक्षपातीताही कमकुवत होत आहे, आणि त्यामुळेच हा कायदा राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्याचे ऋषी सुनक यांनी सांगितले.