दोन बायकांना भेटायला आला अन् फरार कैदी अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला

दोन दिवसापूर्वी जालन्यातील इंदेवाडी शिवारातील जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून तुळशीराम काळे नावाच्या कैद्याने पलायन केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. या कैद्याच्या आष्टी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

तुळशीराजम काळे याला दोन बायका आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्याने कारागृहातून पलायन केले होते. बायकांना भेटण्यासाठी आलेल्या कैदी परतूल तालुक्यातील संकनपुरी शिवारात लपून बसल्याची माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरके यांना मिळाली होती.

खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नरके कर्मचाऱ्यांच्या पथकासह आज पहाटे संकनपुरी शिवारात पोहोचले. सदर कैदी उसाच्या पिकामध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचत उसाच्या पिकामध्ये लपून बसलेल्या तुळशीराम याला ताब्यात घेतले.