
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आतापासूनच विजयासाठी हेवेदावे करण्यात येत आहेत. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोठी घोषणा केली असून आपण सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत 10 लाख तरुणांना नोकऱ्य़ा मिळतील, असे आश्वासन त्यांनी रविवारी दिले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे रोजगाराच्या मुद्यावरुन आक्रमक होत असताना रविवारी त्यांनी मोठी घोषणा करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या बिहारमध्ये 4 लाख 50 हजार जागा रिक्त आहेत. शिक्षण, आरोग्य, गृह विभाग आणि इतर विभागात राष्ट्रीय सरासरीनुसार 5 लाख 50 हजार नियुक्तांची गरज असल्याकडे यादव यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आपण सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत बिहारमधील 10 लाख तरुणांना नोकऱ्य़ा देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

























































