
सामना ऑनलाईन। मुंबई
शो मॅन राज कपूर यांनी उभारलेल्या आर के स्टुडीओमध्ये यावर्षी शेवटची गणेश स्थापना करण्यात आली. ७० वर्ष जुन्या असलेल्या या स्टुडीओमध्ये दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कपूर कुटुंबाने हा स्टुडीओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यावर्षी बाप्पाला समस्त कपूर कुटुंबाने शेवटचा निरोप दिला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, ऋषि कपूर, राजीव कपूर आणि रणबीर कपूर बाप्पाच्या विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आर के च्या बाप्पाच्या दर्शनासाठी यावेळी पहिल्यांदाच सामान्य नागरिकांना स्टुडिओत प्रवेश देण्यात आला होता. विसर्जनासाठी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला ट्रकमध्ये चढवण्यात आले. यावेळी रणधीर कपूर भावूक झाले होते.

बाप्पाला निरोप देताना ते फार उदास झाले होते. रणबीर मात्र शांतपणे गर्दीतून वाट काढत ट्रकबरोबर चालत होता. नंतर चाहत्यांनी मुन्नाभाई हाका मारत त्याच्याभोवती गराडा घातला. यामुळे चाहत्यांचे आभार मानत तो बाप्पाच्या ट्रकमध्ये चढला.

कपूर कुटुंबाचे आर के स्टुडिओ बरोबर अनोखे नाते आहे. राज कपूर यांच्या बहुतेक चित्रपटांची निर्मिती याच स्टुडीओत झाली होती. पण कालानुसार चित्र बदलले. चित्रपटांच्या शूटींगसाठी निर्माते पश्चिम उपनगरातील स्टुडीओला पसंती देऊ लागले आहेत. यामुळे आर केचा डोलारा सांभाळणे कपूर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर झाले आहे. त्यातच काही महिन्यापूर्वी आर के स्टुडिओला अचानक आग लागली .यात कपूर कुटुंबाला अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळेच काळजावर दगड ठेवून आर के स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याचं काही दिवसांपूर्वी ऋषि कपूर यांनी सांगितल होतं.





























































