नगरहून परभणीला पायी प्रवास करणाऱ्या महिलेचा मानवतजवळ अपघाती मृत्यू

428
accident

लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने नगरहून आईकडे दैठणला (ता.परभणी) पायी जाणाऱ्या महिलेचा मंगळवारी मानवतजवळील उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. महिलेने गाव गाठण्यासाठी नगर जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने 300 किलोमीटरचे अंतर कापले होते. गावापासून अवघ्या 40 किलोमीटरच्या अंतरावर मानवतमध्ये अपघाती मृत्यू झाला. सुनीता कैलास कतार असे या मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी मानवत मधील के.के.एम. महाविद्यालयासमोर या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. नगर जिल्ह्यात मजूरीचे काम करणारी सुनीता एकटीच राहत होती. तिची बहिण नांदगावमधील घाटपारा गावी राहते. लॉकडाऊनमध्ये कामधंदा नसल्याने ती बहिणीकडे काही दिवस राहण्यास गेली. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने तिने नगरमार्गे दैठण गावाकडे जाण्याचे ठरवले. मंगळवारीच ती नगरहून निघाली होती. मिळेल त्या वाहनाने तिने 300 किलोमीटरचा प्रवास केला. मंगळवारी सकाळी 5.30 वाजता सुनीताचा मृतदेह मानवतमधील के.के.एम. महाविद्यालयाच्यासमोर असलेल्या उड्डाणपूलाच्या बाजूस आढळला. एखाद्या वाहनाने तिला धडक दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मॉर्निग वॉकला जाणाऱ्या काही नागरिकांना तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची मानवत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या