
पश्चिम बंगालमध्ये एका भीषण रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.
पश्चिम बंगालमधील हांसखाली भागात हा अपघात झाला आहे. उत्तर 24 परगणाच्या बागदामधून मृतदेह घेऊन जाणारी मेटाडोर गाडी एका ट्रकला धडकली. मेटाडोरमध्ये 20 पेक्षा जास्तजण होते. ते मृतदेह घेऊन स्मशानात जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. शनिवारी रात्री हा अपघात झाला. हांसखाली भागात फूलबाडीमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मेटाडोर धडकून हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. दाट धुके आणि भरधाव वेगामुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.





























































