
सामना प्रतिनिधी, कल्याण
आचार्य अत्रे रंगमंदिर ते टिळक चौक या कल्याणच्या मुख्य बाजारपेठ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र या रस्त्याचे भाग्य आता उजळणार असून सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून जवळपास एक किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे.
ऐतिहासिक कल्याण नगरीची जुनी ओळख असणारा भाग म्हणजे बाजारपेठ परिसर. मात्र आचार्य अत्रे रंगमंदिरपासून गांधी चौक, दूध नाका, पारनाका, टिळक चौक या मुख्य बाजारपेठ या रस्त्यांची गेल्या दहा वर्षांपासून पुनर्रबांधणीच झालेली नाही. केवळ डागडुजी केली जात आहे. यामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातही होत आहेत. ही बाब शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्या निदर्शनास आणून या पूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली.
आयुक्तांनी तत्काळ या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे मान्य केले. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून रस्ते बांधणीसाठी 50 कोटींचा निधी मंजूर असून यातील निधी बाजारपेठ रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले, तसे आदेश त्यांनी कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना दिले.




























































