
सामना प्रतिनिधी । धुळे
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल-दलवाडे परिसरात दमदार पाउस झाला. त्यामुळे विरदेल ते दलवाडे या गावांना जोडणारा रस्ता वाहून गेला. विशेष म्हणजे दोन महिन्यापुर्वी रस्त्याचे डांबरीकरण आणि फरशीचे काम करण्यात आले होते. काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. याबाबत कार्यकर्त्यांनी स्थनगानदेश देखील मिळविला होता. परंतु स्थगनादेशाला न जुमानता ठेकेदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी काम रेटून नेले. रस्ता आणि फरशी पहिल्याच पावसात वाहून गेल्यामुळे विरदेल ते दलवाड्याजवळ दळण-वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील शिरपुर आणि शिंदखेडा तालुक्याच्या काही भागात मंगळवारी दुपारी दमदार पाउस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शिरपुर तालुक्यातील जुने भामपुर परिसरात गेल्या चाळीस वर्षात अल्पावधीत इतका पाउस झाला नाही. जोरदार पावसाच्या सरींमुळे जुने भामपुर परिसरातील पांढरी नाल्याला पुर आला. याच परिसरात असलेल्या उखळवाडी आणि मुखेड लघु प्रकल्पातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. हे सर्व पाणी पांढरी नाल्यात येवुन मिळाले. त्यामुळे नाल्यातुन पावसाच्या पाण्याचे मोठे लोंढे वाहु लागले. काही कळायच्या आत खळवाड्या वाहू लागल्या. खळवाड्यांमध्ये असलेली जनावरे नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यात दोन म्हशी आणि तीन बैल वाहून गेलेत. पुढे काही अंतरावर त्यांचा मृत्यू झाला. पावसाचे पाणी आणि नाल्याचा पुर यामुळे अनेकांच्या शेतातील खळवाड्या उध्दवस्त झाल्या खळवाडीतील शेतीपयोगी साहित्य, अवजारे, चारा, पाईप आणि इतर साहित्य नाल्याच्या पुरात वाहून गेले.
अशाच स्वरुपाचे नुकसान शिंदखेडा तालुक्यातील विरदेल, दरवाडे परिसरात झाले आहे. पावसामुळे विरदेल-दरवाडे हा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच रस्त्याचे काम करण्यात आले होते. याबाबत नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी. ठेकेदारासह काम रेटुन नेण्यास मदत करणाऱ्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी अपेक्षा पोलीस पाटील आनंद देशमुख, पंढरीनाथ देसले, भाऊसाहेब देसले, रतीलाल पाटील, आनंद बेहरे यांनी केले आहे.
लाखोंचे नुकसान
जिल्ह्यातील शिरपुर आणि शिंदखेडा तालुक्याच्या काही भागात सोमवारी दुपारी दमदार पाउस झाला. शिरपुर तालुक्यातील जुने भामपुर परिसरातील पावसामुळे पांढरी नाल्यास मोठ्या प्रमाणात पुर आला. त्यात दोन म्हशी आणि तीन बैल पुरात वाहुन गेले. पुढे त्यांचा बुडून मृत्यू झाला. दमदार पावसामुळे जुने भामपुर परिसरातील खळवाड्या, जनावरांचे गोठे वाहून गेले. तसेच शेती साहित्य, पाईप, चारा पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
































































