सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील खड्डा भरण्यात हलगर्जीपणा; संतप्त नगरसेवकांनी अधिकाऱ्यांनाच खड्डय़ात बसविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कत्तलखाना परिसरातील ड्रेनेजलाईनचे ड्रिलिंग करताना शंभर फुटी रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. वारंवार मागणी करूनदेखील हा खड्डा भरला गेला नव्हता. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध करत खड्डय़ात उतरून आंदोलन केले. यावेळी एमजीपी व मनपा ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनाही खड्डय़ात बसविण्यात आले. अखेर महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपायुक्त राहुल रोकडे यांनी आदेश देऊन तातडीने कामाला सुरुवात करून चार दिवसांत खड्डय़ाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका करून आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या वर्षभरापासून डॉ. पी. आर. पाटील मार्गावर ड्रेनेजचे काम सुरू आहे. कत्तलखाना येथून राजश्री शाहू महाराज मार्ग (शंभरफुटी) रस्त्यापर्यंत ड्रिलिंग करत ड्रेनेजचे काम सुरू आहे. वर्ष झाले तरी हे काम पूर्ण झाले नाही. पंधरा दिवसांपूर्वी कत्तलखाना रोड येथून ड्रिलिंग करताना शंभर फुटी रस्ता खचला आणि मोठा खड्डा पडला. यामुळे या रस्त्यावरील मेन ड्रेनेज लाईन ब्लॉक झाली. परिसरातील अनेक भागांत ड्रेनेजचे पाणी घुसले. शिवाय खड्डय़ामुळे अपघातदेखील झाले. या भागातील नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले यांनी ड्रेनेज अधिकारी व ठेकेदारांकडे तक्रार केली होती. मात्र, ठेकेदाराने कामच बंद ठेवल्यामुळे संतप्त नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, फिरोज पठाण, सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक, संदीप दळवी आदींनी खड्डय़ात उतरून आंदोलन केले. प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

आंदोलनाची बातमी समजताच, मनपा ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता कुरणे, अभियंता सुनील पाटील, तेजस शहा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता मिलिंद पाटील, ठेकेदार कंपनीचे सुधीर सांगवी आंदोलनस्थळी आले. त्यांनी कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही दिली. मात्र, आंदोलकांनी सर्व अधिकाऱ्यांना खड्डय़ात बसवून ठेवले. कामाचे आदेश झाल्याशिवाय अधिकाऱ्यांना खड्डय़ातून बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करू, अशी ग्वाही दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका झाली. दुपारनंतर कामाला सुरुवात झाली होती.

ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा – मंगेश चव्हाण
डॉ. पी. आर. पाटील रस्त्यावर ड्रेनेजचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या ठिकाणी ड्रिलिंगच्या साहाय्याने काम केले जात आहे. मात्र, चार दिवस काम सुरू आणि दहा दिवस बंद अशीच स्थिती आहे. ड्रेनेजमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. खड्डा बुजवावा, अशी मागणी केली जात होती. याप्रकरणी ठेकेदारावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिला.

ड्रेनेजवर विशेष महासभा घ्यावी – अभिजित भोसले
ड्रेनेज योजनेचे काम दहा वर्षांपासून सुरू आहे. अद्यापि योजनेचे काम बाकी आहे. दीड महिन्यात काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. सर्व ठिकाणी मनुष्यबळ आणि मशिनरीचा पुरवठा वाढवून कोणत्याही परिस्थितीत दि. 31 मे पूर्वी काम पूर्ण होणे आवश्यक आहे. ड्रेनेज प्रश्नावर विशेष महासभेची मागणीदेखील केली आहे, असे अभिजित भोसले यांनी सांगितले.