मिंधे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघातील रस्ते गेले खड्ड्यात; रांगोळ्या काढून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन

pot-hole

राजकारणात मश्गूल असलेल्या मिंधे गटाच्या आमदारांचं त्यांच्या मतदारसंघातील कामांकडे लक्षं नसल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मिंधे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विधानसभा क्षेत्रात असाच अनुभव लोकांना येत असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा शहरातील मुस्लीम लायबरी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे हा शहरातील एक महत्त्वाचा मार्ग असून जिल्हाधिकारी ऑफीस, पोलीस मुख्यालय, तसेच महत्वाची कार्यालयं याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे नागरिकांना याच मार्गानं जा-ये करावी लागते.

खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकदा नगर परिषद भंडारा यांना निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून त्या खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन केलं आहे.

एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागृत होईल काय? असा प्रश्न देखिल उपस्थित केला जात आहे.