वृद्धांना फसविणारा बोलबच्चन गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाकूचा धाक दाखवून एका महिलेचे दागिने लुटण्यात आल्यामुळे आम्ही परिसरात सापळा रचला आहे. अशा परिस्थितीत सोन्याची चेन घालून फिरू नका, ती रुमालात काढून ठेवा. तर कधी मी नगरसेवक असून परिसरात सोनसाखळी चोर फिरत आहेत, चेन काढून ठेवा अशा बतावण्या करीत वृद्धांचे दागिने चोरून नेणाऱया एका पाच वर्षे फरार असलेल्या भामटय़ाला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.

अरविंद कांबळे (49) असे त्या बोलबच्चन करून वृद्धांना लुटणाऱया भामटय़ाचे नाव आहे. चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहणाऱया अरविंदची बोलबच्चनगिरी करून वृद्धांना लुटणारी टोळी आहे. 2014 मध्ये त्याने विजय तांबे ऊर्फ राजू शेट्टी याच्यासह वासुदेव धुमाळ (63) आणि यदु काळे (73) यांच्या सोन्याच्या चेन वेगवेगळी कारणे सांगून लुटून नेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी विजयला पकडले होते, मात्र अरविंद फरार झाला होता. काळाचौकी पोलीस आरोपीचा शोध घेत होते, पण तो ओळख बदलून लपून राहत होता. अखेर अरविंद चेंबूरच्या भीम टेकडी परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हिरे, उपनिरीक्षक पुकळे तसेच सय्यद, रेडेकर, पोटे या पथकाने वाशी नाका परिसरात सापळा रचून अरविंदच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरोधात मुलुंड, विलेपार्ले, ताडदेव, शिवाजी पार्क, काळाचौकी पोलीस ठाण्यात वृद्धांना फसविल्याचे गुन्हे आहेत.