लग्न समारंभात डल्ला मारणारी परराज्यातील टोळी पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातून येऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिह्यांत लग्न समारंभामधून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी सातजणांची टोळी नगर स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. मध्य प्रदेश येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

गोलू सुमेर झोजा ऊर्फ सिसोदिया (वय 25), संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय 19), राधेश्याम उदयराम राजपूत (वय 30), बिपीन राजपाल सिंग (वय 21), गिरिराज दिनेशचंद शुक्ला (वय 25), अनिल कमल सिसोदिया (वय 30), विशालकुमार बनी सिंग (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शिर्डी इथे झालेल्या एका विवाह समारंभात या टोळीने दीड लाख रुपयाची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास करत गुन्हे शाखेने गुप्त माहिती काढत तपास करून आरोपींना शोधून काढले. या टोळीने अशाच प्रकारे गुन्हे केले असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. मध्य प्रदेशातील देवास, गुलखेडी, कडियासी या ठिकाणी तपास करून या सात आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 55 हजारांची रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, सहा मोबाईल असा एकूण 23 लाख 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सोन्याबापू नाणेकर, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोलीस नाईक संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल संदीप दरंदले यांच्या पथकाने ही कारवाई केली.