
सामना प्रतिनिधी । सेनगाव
सेनगाव शहरातील कपडा व्यापारी अनिल साबु हे वैद्यकीय उपचारासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडुन सात लाख रुपयांचे सोने व रोख 80 हजार रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना घडली आहे. यापुर्वी झालेल्या चोऱ्यांचा तपास गुलदस्त्यात असतांना आता या मोठ्या चोरीच्या तपासाचे आव्हान पोलीसांसमोर उभे ठाकले आहे.
सेनगाव शहरातील व्यापारी अनिल साबु हे त्यांच्या कुटुंबीयांसह वैद्यकीय उपचारासाठी संभाजीनगरला गेले होते. बुधवारी ते गुरुवारच्या रात्री दरम्यान चोरट्यांनी साबु यांचे घर फोडुन चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पहिल्या मजल्यावर साबु यांचे तयार कपड्याचे दुकान असुन दुसऱ्या मजल्यावर घर आहे. चॅनेल गेटच्या आतील बाजुचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी साबु यांच्या घरात प्रवेश केला व शयनखोलीतील कपाट तोडुन त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. साबु हे संभाजीनगरहुन गुरुवारी परत आल्यावर त्यांना ही घटना समजली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडरवार, सेनगावचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अंगुलीमुद्रा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरातील भिंती तसेच कपाटावरील ठशाचे नमुने घेतले. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी अंकित अनिल साबु यांची तक्रार प्राप्त झाली असून 7 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख 80 हजार रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































