
गोवा-सिंधुदुर्ग सागरी हद्दीनजीक खोल समुद्रात गोवा येथील मासेमारी ट्रॉलरवर दरोडा टाण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मालवण सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या मालकीच्या ओंकार या ट्रॉलरवरील सुमारे सोळा मच्छीमारांवर लाखो रुपयांच्या मासळी व साहित्याची लूट तसेच दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्युरिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रॉलर तसेच चोरी केलेली मासळी, एलईडी बल्ब आदि साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गोवा पोलीस शनिवारी सकाळी मालवणात दाखल झाले. सर्व संशयित आरोपींना मालवण पोलीस ठाण्यात आणून प्राथमिक कारवाई करत सोडून देण्यात आले आहे. पुढील तपास व कारवाई सुरू राहणार असून जप्त केलेल्या ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव करून मिळालेली रक्कम गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी खोल समुद्रात सुमारे 60 ते 65 नॉटीकल मैल अंतरावर मासेमारी करणार्या कोलवा गोवा येथील जुवाव फर्नांडिस यांच्या ट्रॉलरला सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या ट्रॉलरने घेरल्याची घटना परवा मध्यरात्री घडली. यात फर्नांडिस यांचा ट्रॉलर घेरत ट्रॉलरवरील मासळी तसेच अन्य साहित्य असे एकूण 9 लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी फर्नांडिस यांनी गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे तक्रार केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्युरिटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर शुक्रवारी मालवण पोलिसांच्या गस्तीनौकेने नारायण आडकर यांचा मालकीचा ओंकार ट्रॉलर समुद्रात पकडून येथील बंदरात आणला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी होती. या ट्रॉलरवर कारवाई करण्याबाबत मत्स्य व्यवसाय अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलीस उपनिरीक्षक ऑल्विटो फर्नांडिस, केदार भवर, जयेश तारी यांचे पथक मालवणात दाखल झाले. गुन्ह्यातील ट्रॉलर मालवण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. या ट्रॉलरवरील मासळीचा मत्स्यव्यवसाय अधिकार्यांच्या उपस्थितीत बंदरावर लिलाव करण्यात आला. 2 लाख 33 हजार 60 रुपयांना मासळीचा लिलाव झाला. ट्रॉलरवर सुरमई, बांगडा, पापलेट, म्हाकूल तसेच अन्य प्रकारची मासळी होती. दुपारी उशिरा लिलावाची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. शिवाय जप्त केलेला ट्रॉलरही स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.
ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी नारायण ऊर्फ भगवान सहदेव आडकर (वय-49 रा. सर्जेकोट-मिर्याबांदा), निहाल राजाराम आडकर (वय-22 रा. सर्जेकोट-मिर्याबांदा), पुंडलिक कमलाकर शेलकर (वय-37 रा. कोळंब खालचीवाडा), मयुर हरी खवणेकर (वय-23 रा. सर्जेकोट पिरावाडी), किशोर सुभाष कांदळगावकर (वय-42 रा. कोळंब खालचीवाडा), तेजस शंकर फोंडबा (वय-23 रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत संभाजी पाडकर (वय-32 रा. सर्जेकोट मिर्याबांदा), केदार प्रकाश कुडाळकर (वय-25 रा. सर्जेकोट मिर्याबांदा), हर्षल रवींद्र पराडकर (वय-30 रा. सर्जेकोट मिर्याबांदा), राहुल दिलीप आडकर (वय-19 रा. सर्जेकोट पिरावाडी), गोविंद मारूती सावजी (वय-22 रा. सर्जेकोट मिर्याबांदा), जगन्नाथ अंकुश सावजी (वय-31 रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (वय-31 रा. सर्जेकोट), नीलेश रमेश आडकर (वय-28 रा. सर्जेकोट पिरावाडी), हनुमंत भालचंद्र कवटकर (वय-30 रा. सर्जेकोट जेटी), जगदीश खंडोबा कांदळगावकर (वय-34 रा. सर्जेकोट मिर्याबांदा) या सोळा जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर पुढील तपासावेळी सर्व संशयितांना बोलावून घेत चौकशी केली जाणार असल्याचे हार्बर कोस्टल सेक्युरिटी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले.

























































