बोपन्नाला डेव्हिस चषकात विजयाने निरोप, हिंदुस्थानचा मोरोक्कोवर 4-1 असा दणदणीत विजय

महान टेनिसपटू रोहन बोपन्नाला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गट-2मध्ये रविवारी दणदणीत विजयासह निरोप देण्यात आला. यजमान हिंदुस्थानने मोरोक्कोचा 4-1 फरकाने धुव्वा उडवीत विजय मिळविला. या विजयास हिंदुस्थानने जागतिक गट-1 प्ले आफचे तिकीट बुक केले. आता हिंदुस्थानी संघ आगामी वर्षी या स्पर्धेत खेळणार आहे.

शनिवारी उभय संघ 1-1 असे बरोबरीत होते. रोहन बोपन्ना व युकी भांबरी या हिंदुस्थानी जोडीने रविवारी इलियट बेनचेट्रिट व यूनुस लालामी लारौसी या मोरोक्कोच्या जोडीचा 6-2, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुमित नागलने यासीन डिलीमीचा 6-3, 6-3 असा पराभव केला. त्यानंतर हिंदुस्थानच्या दिग्विजय प्रताप सिंहने मोरोक्कोच्या वालिद अहौदीचा 6-1, 5-7, 10-6 असा पराभव करून हिंदुस्थानला 4-1 असा विजय मिळवून दिला.

बोपन्नाच्या मॅरेथॉन कारकीर्दीची सांगता

रविवारचा दिवस अर्थातच रोहन बोपन्नाचा होता. कारण त्याच्या 21 वर्षांच्या मॅरेथॉन कारकीर्दीतील आज शेवटचा सामना होता. बोपन्ना-भांबरी जोडीचा मैदानावरील समन्वय कौतुकास्पद होता. बोपन्नाच्या ताकदवर फोरहॅण्डपुढे प्रतिस्पर्धी मोरोक्कोची जोडी निष्प्रभ ठरली. त्यामुळे हिंदुस्थानी जोडीने सहज विजयाला गवसणी घातली. विजयानंतर बोपन्नाने उपस्थित प्रेक्षकांची अखेरची मानवंदना स्वीकारली. प्रत्येक चाहत्याला तो फ्लाइंग किस देत होता. प्रत्येक संघसहकार्याला हस्तांदोलन करून त्याने कोर्टवर चारही बाजूला फेरी मारून आपल्यावर प्रेम करणाऱया प्रेक्षकांचे आभार मानले.