
हिंदुस्थानच्या रोहन बोपण्णाने इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष दुहेरी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. रोहन याने आपला सहकारी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यु अॅब्डन याच्या सोबतीने विजेतेपदावर नाव कोरलं. या जोडीने अग्रमानांकित ब्रिटनच्या नील स्कूप्स्की आणि नेदरलँड्सच्या वेस्ली कूलहॉफ या जोडीवर टायब्रेकरने मात केली. या विजयासोबत रोहन बोपण्णा हा एटीपी 1000 मास्टर्सचं विजेतेपद पटकावणारा सगळ्या वयस्कर खेळाडू ठरला आहे.
रोहन बोपण्णा याचं वय 43 इतकं आहे. या संपूर्ण स्पर्धेत बोपण्णा-अॅब्डन या जोडीने दमदार खेळ केला. याच खेळाच्या जोरावर त्यांनी उपउपांत्य फेरीत त्यांनी कॅनडाचे तरुण खेळाडू डेनिस शापोवालोव- फीलिक्स ऑगर-आलियासिमे या जोडीवर विजय मिळवला. तर उपांत्य फेरीत त्यांनी गतविजेती जोडी जॉन इश्नर-जॅक सॉक या जोडीचा पराभव केला.
अंतिम फेरीत त्यांचा सामना अग्रमानांकित ब्रिटनच्या नील स्कूप्स्की आणि नेदरलँड्सच्या वेस्ली कूलहॉफ या जोडीशी झाला. बोपण्णा – अॅब्डन या जोडीने 6-3, 2-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. हे विजेतेपद पटकावणारा रोहन बोपण्णा हा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला आहे.





























































