दिवंगत अरुण जेटली यांचा मुलगा रोहन जेटली याची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. डीडीसीएची निवडणूक 5 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून अध्यक्षपदासाठी रोहन जेटली याच्याकडून एकमेव अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची बिनविरोध निवड होईल हे निश्चित आहे.
खजिनदार पदासाठी मात्र दोन व्यक्तींमध्ये चुरस लागणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सी. के. खन्ना यांची पत्नी शशी खन्ना व गौतम गंभीरचे नातेवाईक पवन गुलाटी यांच्यामध्ये रस्सीखेच लागणार आहे. तसेच अशोक शर्मा, दिनेशकुमार शर्मा, हरीश सिंगला, हर्ष गुप्ता, करनेल सिंग, मनजीत सिंग, परदीपपुमार अरोरा, प्रदीप अगरवाल व सुधीर अगरवाल हे संचालकपदाच्या चार जागांसाठी लढत आहेत.




























































