
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बेकरे गावचा तरुण रोहन अर्जुन कराळे हा ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिला आला आहे. विशेष म्हणजे रोहन कराळे याने राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन पदासाठी परीक्षा दिल्या. या दोन्ही परीक्षेत राज्यातून पहिला येण्याचा मान त्याने मिळविला आहे. त्याच्या या यशाने रोहनवर व त्याच्या कुटूंबावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. रोहन अर्जुन कराळे याच्या यशाने बेकरे गावासह रायगडच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कल्याण कर्जत राज्यमार्गावर असलेले बेकरे गावातील रहिवासी अर्जुन कराळे यांना रोहन व आनंद ही दोन मुले. अर्जुन कराळे हे रेल्वेमध्ये सबरमन गार्ड पदावरून आता रिटायर्ड झाले आहेत. त्यामुळे रोहनला अभ्यासाच्या दृष्टीने घरचे वातावरण हे उत्तम होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या रोहनचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले आहे. माध्यमिक शिक्षण डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण कर्जत येथील अभिनव विद्यामंदिर येथे घेतले. त्यानंतर त्याने तासगावकर इंजिनियर कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन या विषयाची पदवी संपादन केली.
इंजिनियरिंग पदवी घेतल्यानंतर ठाणे रबाले येथे एका खाजगी कंपनीत दीड वर्ष नोकरी केली. मात्र नोकरी करण्याचा नाद सोडून रोहनने भावाच्या पायावर पाय ठेऊन स्पर्धा परिक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. रोहनचा भाऊ आनंद कराळे यानेही स्पर्धा परीक्षा देऊन शिक्षकी पेशा पत्करला आहे. त्यामुळे भावाच्या मार्गदर्शनाखाली रोहनने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
रोहनने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात गेला. सेल्फ स्टडी हे सूत्र वापरत त्याने यशाला गवसणी घातली आहे. मात्र यासाठी त्याने पाच वर्षे अहोरात्र अभ्यास करून हे यश संपादित केले आहे. यासाठी रोहन हा रोज नऊ ते दहा तास अभ्यास करीत होता. तर परिक्षेकाळात बारा तास अभ्यास करायचा. त्याच्या या मेहनातीमुळेच आज त्याच्या पदरात यश पडले आहे.
रोहनने त्याच्या या यशाचा वाटा आपल्या कुटूंबाला दिला आहे. तर विद्यार्थ्यांनी पदवी काळातच स्पर्धा परिक्षेकडे वळण्याचा सल्ला रोहनने दिला असून पालकांनी मुलांना स्पर्धा परिक्षेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या जिल्ह्यातील तरुण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करू शकतो. असे रोहन याने प्रतिक्रिया दिली आहे.




























































