वडिलांना किडनी दिली, जनतेसाठी प्राणही द्यायला तयार

माझ्या आई-वडिलांना, भावांना जनतेने प्रचंड प्रेम दिले, तेच प्रेम मला मिळत आहे. जनतेचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करेन. मी माझ्या वडिलांना किडनी दिली, पण जनतेसाठी प्राणही द्यायला तयार आहे, अशा शब्दांत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी आज भावना व्यक्त केल्या. रोहिणी यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराला  सोनीपूर येथील पहेलझा घाट येथून सुरुवात केली. यावेळी स्थानिकांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून दणक्यात स्वागत केले.

रोहिणी यांनी हरिहरनाथ मंदिरात पूजाअर्चा करताना फोटो ‘एक्स’वरून प्रसिद्ध करतानाच बाबा हरिहरनाथ आणि सारण येथील जनताजनार्दन दोघांचे आशीर्वाद घेतले, अशी पोस्टही केली आहे. त्यामुळे रोहिणी आचार्य लोकसभा निवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा रंगली आहे. बिहारच्या जनतेकडून इतका मोठा प्रतिसाद मिळाला हे अविश्वसनीय आहे. आज जणू बिहारची मुलगी आपल्या घरी आल्यासारखे वाटत आहे, असेही रोहिणी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.