जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगायची, बदलापूरप्रकरणी रोहित पवार यांची भाजपवर टीका

बदलापूर येथील लैंगिक शोषण प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी महाराष्ट्र भाजपवर टीका केली आहे. एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, सहआरोपी असलेल्या व्यक्तीला थेट स्वीकृत नगरसेवक पद देताना भाजपला किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती. नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून अशा लोकांना पदे देणे म्हणजे भाजप अजून किती खालच्या पातळीवर जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी या निर्णयातून भाजप जनतेला नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित करत अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर, बलात्कारी नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर नसून खून करण्यात आला, असे आता म्हणायचे का, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जनता हे सर्व विसरते, हेच या प्रकरणातील सर्वात मोठे दुर्दैव असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.