
भाजपमध्ये घराणेशाही चालणार नाही, असे भाजप नेते म्हणतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमधील घराणेशाही टॉपवर आहे. एका घरात पाच-सहा जणांना उमेदवारी दिली जात असून काही ठिकाणी याच घराणेशाहीतून कुणाची पत्नी, आई, सून यांना बिनविरोध निवडून आणले जात आहे. याचाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘बिनविरोध’साठी साम-दाम-दंड-भेदचा सर्रास वापर केला जात असून निवडणूक आयोग चकार शब्दही काढत नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार यांनी शुक्रवारी सकाळी एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. यात ते म्हणतात, सत्तेचं अमर्यादित केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसालाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावं, या दृष्टीकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडं पाहिलं जातं… पण आज मंत्र्यांचीच पत्नी, आई, मामेभाऊ किंवा नेत्याची सून ‘बिनविरोध’ निवडून आणली जातेय.. या ‘बिनविरोध’साठी साम-दाम-दंड-भेद याचा सर्रास वापर केला जातो.
Nanded News भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी
निवडणुका ज्या निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होणं अपेक्षित आहे त्यालाच गुंडाळून ठेवलं जातं आणि निवडणूक आयोग मात्र याबाबत चकार शब्दही काढत नाही. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांकडूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदंही बळकावली जात असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुकीचा फार्स करण्याची तरी काय गरज आहे? अशाने हळूहळू लोकशाही संपण्याची भीती वाटतेय आणि असं झालं तर सर्वाधिक त्रास हा सामान्य माणसाला भोगावा लागणार आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
सत्तेचं अमर्यादित केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसालाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावं, या दृष्टीकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडं पाहिलं जातं… पण आज मंत्र्यांचीच पत्नी, आई, मामेभाऊ किंवा नेत्याची सून ‘बिनविरोध’ निवडून आणली जातेय.. या ‘बिनविरोध’साठी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 21, 2025


























































