हिंदुत्वाचं पांघरुण घेऊन स्वतःची घरं… रोहित पवार यांनी भाजपला फटकारले

भाजप आता party with Difference म्हणून ओळखला जाणारा पक्ष नाही तर party with selective preference असलेला पक्ष आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी मागील 20 वर्षांत काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची आकडेवारी मांडली असून देशाला लुटतंय कोण आणि हिंदुत्वाचं पांघरुण घेऊन स्वतःची घरं भरतंय कोण, हेही यानिमित्ताने पुढे आल्याचं ते म्हणाले आहेत.

रोहित पवार यांनी ट्वीटरवर पोस्ट करत काँग्रेस आणि भाजपच्या खात्यात जमा असलेल्या रकमेची तुलनात्मक आकडेवारी मांडली आहे. ते म्हणाले की, “देशात सुमारे 50 वर्ष सत्तेत राहूनही 2004 साली काँग्रेसच्या खात्यात केवळ 38 कोटी रुपये होते तर भाजपच्या खात्यात होते 88 कोटी. 20 वर्षानंतर आज काँग्रेसच्या खात्यात अवघे 133 कोटी रुपये तर भाजपच्या खात्यात तब्बल 10,107 कोटी रुपये आहेत. यावरुन भाजप आता Party With Difference म्हणून ओळखला जाणारा पक्ष नाही तर Party With Selective Preference असलेला पक्ष आहे, असंच म्हणावं लागेल. शिवाय देशाला लुटतंय कोण आणि हिंदुत्वाचं पांघरुण घेऊन स्वतःची घरं भरतंय कोण, हेही यानिमित्ताने पुढं आलं हे बरं झालं.” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

मर्जीतल्या कंपन्यांना कंत्राट देण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. या कंपन्यांनी सुद्धा भाजपला भरभरून देणग्या दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, “पुर्वोत्तर राज्यांचा अभ्यास केला तर ज्या कंपन्यांना तिथं कंत्राटं मिळाली त्याच कंपन्यांनी भाजपला 60 टक्के पेक्षा जास्त देणग्या दिल्या आहेत. 50 वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यात कार्यालये उभारता आली नाहीत, मात्र केवळ 12 वर्षात भाजपने प्रत्येक जिल्ह्यात पंचतारांकित कार्यालये थाटली आहेत.” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“रुपया निच्चांकी पातळीवर घसरतोय, रोजगाराअभावी देशात बेरोजगारीचा भस्मासूर आ वासून उभा आहे, सामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे, पण भाजप मात्र मस्त आहे. जनतेने हे वेळेत ओळखलं नाही तर देशात केवळ भांडवलदारी आणि देश केवळ भांडवलदारांच्याच विळख्यात अडकायला वेळ लागणार नाही.” अशी भिती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.