राज्यात सत्ताधाऱ्यांकडून निवडणूकीदरम्यान दोन हजार कोटींचे वाटप, रोहित पवारांचा आरोप

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीतील चार टप्पे पार पडले असून शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्याला अवघे सहा दिवस बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात दोन हजार कोटींचे वाटप केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ”यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचं होत आहे. नेत्यांना विकत घेण्यासाठी, जनतेला भुलवण्यासाठी, गुंडांसाठी आत्तापर्यंत राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तर मागच्या अडीच वर्षांत या सरकारने 25 हजार कोटींचे घोटाळे केले आहेत, असा आरोप रोहीत पवार यांनी केला आहे. सोबतच आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या सगळ्या प्रकरणांची चौकशी करु असा इशारा रोहीत पवार यांनी दिला आहे.