टीम इंडिया रोहित-कोहलीसह ऑस्ट्रेलियाच्या स्वारीवर

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ‘टीम इंडिया’चे माजी कर्णधार बुधवारी हिंदुस्थानी संघाच्या पहिल्या तुकडीसोबत ऑस्ट्रेलियाच्या स्वारीवर रवाना झाले. दोघांना दिल्ली विमानतळावर पाहण्यात आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने म्हटलं की, ‘ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी रोहित आणि कोहली या स्टार खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळताना पाहण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल.’

रोहित आणि कोहली 9 मार्चला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. दोघांनी यंदाच सिडनी येथे झालेला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ‘टीम इंडिया’चे हे दोघेही धुरंधर टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले असून आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून रोहित अणि कोहलीच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा असतील.

गिलजैस्वालसह पहिली तुकडी रवाना; गंभीरचे सायंकाळी उड्डाण

हिंदुस्थानी संघाच्या पहिल्या तुकडीत रोहित शर्मा, विराट कोहली, नवा कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. हे सर्वजण बुधवारी सकाळी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाले, तर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि उर्वरित सहाय्यक स्टाफने सायंकाळच्या फ्लाइटने उड्डाण केले.

‘टीम इंडिया’चा नवा कर्णधार शुभमन गिल म्हणाला, ‘विराट आणि रोहित यांचा अनुभव ऑस्ट्रेलियात आमच्यासाठी फार मौल्यवान ठरेल. मी त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की, त्यांनी तिथे आपली जादू दाखवावी.’

हिंदुस्थानविरुद्ध खेळता येणं निराशाजनक पॅट कमिन्स

‘विराट कोहली आणि रोहित शर्मा मागील 15 वर्षांपासून जवळजवळ प्रत्येक हिंदुस्थानी संघाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी त्यांना येथे खेळताना पाहण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल. दोघेही हिंदुस्थानसाठी महान खेळाडू आहेत आणि त्यांना नेहमीच प्रचंड समर्थन मिळतं. जेव्हा आम्ही हिंदुस्थानविरुद्ध खेळतो तेव्हा स्टेडियममध्ये जबरदस्त वातावरण निर्माण होतं. हिंदुस्थानविरुद्धची ही सफेद चेंडूवरील मालिका चुकवावी लागणं खूप खेदजनक आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला. 32 वर्षांचा कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार आहे.

ही रोहितकोहलीची शेवटची मालिका?

‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नुकतेच सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी मालिकेत चांगली कामगिरी करतील. मात्र 2027 मध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषकात हे दोघे खेळतील का, याबाबत आताच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. गंभीर म्हणाले, ‘वन डे वर्ल्ड कप अजून दीड-दोन वर्षांवर आहे. सध्या वर्तमानात राहणे गरजेचे आहे. दोघेही उत्तम खेळाडू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा ऑस्ट्रेलियात नक्कीच फायदा होईल.’