
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘रनमशीन’ विराट कोहली आणि ‘हिटमॅन’, द्विशतकांचा बादशाहा रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या एक दिवसीय सामन्यात टीम इंडियाने विडीजचा 8 विकेटने पराभव केला. रोहित शर्माने अखेरपर्यंत नाबाद राहात 152 धावा चोपल्या. या खेळीसह त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला मागे टाकत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
HITMAN joins the party
Brings up his 20th ODI ton off 84 deliveries.#INDvWI pic.twitter.com/DjUNt6wMCF
— BCCI (@BCCI) October 21, 2018
नाणेफेक जिंकल्यानंतर हिंदुस्थानने वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने हिंदुस्थानी गोलंदाजी फोडून काढत 322 धावा चोपल्या, विंडीजने दिलेले 323 धावांचे आव्हान हिंदुस्थानने दोन गड्यांच्या मोबदल्यात 42.1 षटकांत पूर्ण केले. या सामन्यात विराटने 140 धावा केल्या, तर रोहितने 117 चेंडूत 15 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 152 धावा केल्या.
द्विशतकांच्या बादशाहाचा दीडशतकांचा विक्रम
आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक 3 द्विशतकं आहेत. तसेच आता एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 150 धावा चोपणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. रोहितने तब्बल सहा वेळी एक दिवसीय क्रिकेटमध्ये 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर खेळाडू डेव्हीड वॉर्नरच्या नावावर होता. दोघांनी प्रत्येकी पाच वेळा एक दिवसीय क्रिकेटमध्ये 150 धावा केल्या होत्या. परंतु आता रोहितने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विरूच्या शुभेच्छा
दरम्यान, रोहितच्या या नव्या विक्रमाबाबत हिंदुस्थानचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने त्याला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
Double Dhamaka. Kohli and Rohit made it look very easy. Congratulations @ImRo45 on your 6th 150+ score, the first man to do so. Tremendous achievement. #IndvWI
— Virender Sehwag (@virendersehwag) October 21, 2018


























































