जगज्जेतेपद हुकल्यावर क्रिकेट सोडणार होतो! रोहित शर्माकडून कबुली

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार रोहित शर्माने एका कार्यक्रमात 2023च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतरची आपली मानसिक अवस्था उघड केली. त्या पराभवानंतर आपण पूर्णपणे तुटून गेलो होतो आणि क्रिकेट सोडण्याचाही विचार मनात आला होता, अशी कबुली रोहितने दिली.

एका कार्यक्रमात रोहित म्हणाला, ‘2023च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये हरल्यानंतर मला वाटत होते की, आता बस्स झाले क्रिकेट. आता नाही खेळायचं. जणू या खेळाने माझ्याकडील सर्व काही हिरावून घेतले होते. खेळण्याची ताकदच उरली नव्हती.’ रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2023च्या वन डे वर्ल्डकपमध्ये सलग 10 सामने जिंकत फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र, अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.

रोहितने पुढे सांगितले की, ‘हा पराभव आमच्यासाठी न पचणारा होता. 2022 मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यानंतर मी या वर्ल्ड कपसाठी सर्वस्व झोकून दिले होते. सर्वच खूप निराश होते. आपण फायनल हरलो, यावर विश्वासच बसत नव्हता. तो काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता,’ असे तो म्हणाला.

आयुष्य इथेच संपत नाही

फायनलमधील पराभवानंतर शरीरात कोणतीही ऊर्जा उरली नव्हती आणि स्वत:ला सावरायला अनेक महिने लागले, असे रोहितने सांगितले. मात्र स्वत:शी संवाद साधून आणि क्रिकेटवरील प्रेमाची आठवण करून देत तो पुन्हा मैदानात परतला. त्यानंतर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने विजेतेपद मिळवले. सध्या 38 वर्षांचा रोहित शर्मा कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाला असून, तो आता वन डे संघाचा कर्णधारही नाही. मात्र, तो पुढेही वन डे क्रिकेट खेळत राहणार आहे.