
एक काळ होता, जेव्हा एकदिवसीय क्रिकेट म्हणजे सणासुदीचा दिवस असायचा. रंगीत कपडे, मैदानावर प्रेक्षकांचे तुफान आणि बॅटच्या प्रत्येक आवाजावर देशाचं हृदय धडधडायचं. पण गेल्या काही वर्षांत टी-20 च्या चकाकीत 50 षटकांचा हा खेळ थोडा फिका पडला होता. आणि मग, सिडनीच्या उन्हात दोन जुने योद्धे बॅट घेऊन उतरले, एक विराट कोहली आणि दुसरा रोहित शर्मा. शनिवारी दोघांनी केवळ धावा केल्या नाहीत; त्यांनी एकदिवसीय क्रिकेटला पुन्हा जीव दिला. बाकी एक दिवसीय क्रिकेटची कल्पना नाही मात्र हे दोघे ज्या सामन्यामध्ये खेळतील, तो ब्लॉकबस्टर असेल.
शनिवारी ‘रो-को’ची 168 धावांची नाबाद भागीदारी, रोहितच्या नजाकतभऱया 121 आणि विराटचा नाजूक पण धारदार 74. हा डाव म्हणजे “कला आणि क्रूरता’’ यांचं अप्रतिम मिश्रण. मैदानावरच्या प्रत्येक चौकाराबरोबर असं वाटत होतं की, जुना खेळ पुन्हा तरुण झाला आहे.
जेव्हा रोहितने कव्हरमधून तो सरळ फटका मारला तेव्हा सिडनीच्या वाऱ्यात टी-20 च्या गडबडीपेक्षा वेगळी, शांत पण ठाम थरारक लय होती. विराटच्या स्ट्रोक्समध्ये अजूनही तीच काटक धार, तीच जिद्द. जणू काळाने त्याच्या मनगटाला वयाचं ओझं चढूच दिलं नाही.
या डावाने केवळ सामना जिंकला नाही, तर एक घोषणाच केली. एकदिवसीय क्रिकेट अजून मेलं नाही; ते फक्त आपली गाणी पुन्हा लिहितंय!
शुभमन गिल आता या संघाचा नवा कर्णधार असला तरी संघातल्या या दोन्ही वरिष्ठ कलाकारांचा प्रभाव म्हणजे अजूनही शाळेतील गुरुजींसारखा शिस्तीचा, पण प्रेरणेचा. गिल म्हणतोय, दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर पुढील आराखडा ठरवू. पण सिडनीनंतर तो आराखडा आता अधिक तेजस्वी वाटतोय. कारण त्या खेळीने चाहत्यांमध्ये पुन्हा तोच जुना उन्माद जागा केला आहे.
आता पुढे दोघे याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. मग विजय हजारे करंडकाला विराट आणि रोहितच्या उपस्थितीमुळे अनोखे ग्लॅमर लाभणार आहे. या सामन्यांना कधी नव्हे ती प्रेक्षकांची हमखास गर्दी असेल.
शनिवारच्या त्या खेळीने दाखवून दिलं की, खेळाचं सौंदर्य फॉरमॅटमध्ये नसतं; ते खेळाडूंच्या आत्म्यात असतं. जेव्हा विराट-रोहित मैदानात असतात तेव्हा वेळ थांबते, चौकार बोलतात आणि एकदिवसीय क्रिकेट पुन्हा नवे रंग चढवतो. आणि म्हणूनच सिडनीत त्यांनी फक्त सामना जिंकला नाही, तर एकदिवसीय क्रिकेटचं हरवलेलं तेज पुन्हा उजळवलंय. त्यांच्या बॅटमधून फुटलेल्या ठिणग्यांनी खेळाचं जुनं प्रेम पुन्हा पेटलं आहे. त्याचा आता वणवा होऊ दे आणि तो 2027 च्या वर्ल्ड कप पर्यंत पेटत राहो ही प्रत्येक हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची मनापासून इच्छा आहे.




























































