
रोहित शर्मा व विराट कोहली यांनी स्थानिक क्रिकेट खेळायलाच हवे, असा त्यांच्यावर दबाव टाकू नका. हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांना थोडी मोकळीक द्यायलाच हवी, असे परखड मत माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी व्यक्त केले.
‘क्रिकेट लाइव्ह’ कार्यक्रमात संजय बांगर यांनी ही बोलंदाजी केली. ते म्हणाले, ‘विराट कोहली आणि रोहित शर्माच्या यांच्या एकदिवसीय संघातील स्थानाबद्दल अजिबात शंका असू नये. त्यांनी इतक्या वर्षांत हिंदुस्थानी क्रिकेटसाठी काय केलं आहे ते बघा. त्यांनी दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा लय पकडण्यासाठी काही सत्रे पुरेशी असतात. त्यांना युवा खेळाडूंइतके सामने खेळण्याची गरज नाही. ते फिट असतील, भुकेले असतील तर अशा दर्जाच्या खेळाडूंची तुम्हाला नेहमीच गरज असते.’
बांगर पुढे म्हणाले, ‘त्यांच्याशी वेगळय़ा पद्धतीने वागले पाहिजे आणि त्यांना पुरेशी मोकळीक दिली पाहिजे. ते लयीत असताना तुम्हाला फरक जाणवतो. त्यांच्या उपस्थितीमुळेच ड्रेसिंग रूमचे वातावरण बदलते. टेस्ट मालिकेतील अपमानास्पद पराभवानंतर त्यांनी नक्कीच संघातील युवा खेळाडूंशी बोलून त्यांना सावरण्यास मदत केली असेल. त्यांनी संघाला मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने खेळायला प्रवृत्त केले.’





























































