रोखठोक – गंगा, गोदावरी आणि सिंदखेड राजा!

सिंदखेड राजात लखुजीराजे जाधवांचा वाडा आजही आहे. येथेच जिजाऊ मातेचा जन्म झाला. मराठ्यांचे स्वराज्याचे भव्य स्वप्न याच वाड्यात जन्मले व शिवनेरी, रायगडाच्या दिशेने झेपावले. महाराष्ट्रातील सर्वात पवित्र स्थळ म्हणजे हा वाडा. या वाड्याचे जतन करणे गरजेचे आहे. आज सर्व ओसाड व पडिक झाले आहे.

बुलढाण्याच्या प्रवासात सिंदखेडच्या ऐतिहासिक महालात जाता आले. ज्यांनी महाराष्ट्राला शिवछत्रपती राजे दिले त्या जिजाऊ मातेचे हे जन्मस्थान. लखुजीराजे जाधवांचा हा वाडा. शहाजीराजांचे सासर. इतिहासाच्या भरती-ओहोटीचा साक्षीदार असलेला हा वाडा पुरातत्व खात्याच्या अधीन आहे. याच वाड्यात जिजाऊ मातेचा जन्म झाला. आज तेथे भिंती आहेत, पण छत नाही. मोकळ्या आकाशाखाली हा वाडा उभा आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन कसे करावे हे आपल्या पुरातत्व खात्याने युरोप-अमेरिकेत जाऊन पाहायला हवे. कधीकाळी हा वाडा समया व लामणदिव्यांच्या अगणित ज्योतींनी उजळून निघाला होता. लखुजीराजे जाधवांचा हा खानदानी वाडा. उद्याच्या छत्रपतींचे स्वप्न याच वाड्यात जन्मास आले. राजेशाही वैभवाची छत्रचामरे याच वाड्याच्या शिरावर ढाळली गेली. तो वाडा आज फक्त भिंती आहेत म्हणून उभा आहे. याच वाड्यात लखुजीराजे जाधव व शहाजीराजांचा वाद झाला असे सांगतात. हा वाद स्वराज्याच्या मुद्दय़ांवरून होत असे व संतापलेले लखुजीराजे दाणदाण पाय आपटत फिरत, तेव्हा संपूर्ण वाडा हलत असे.

भंग झालेली वास्तू

एक ऐतिहासिक पवित्र वास्तू उभी आहे, पण ती भंग पावल्यासारखी वाटते. ज्या राजवाड्यात लहान जिजाने शेवंती खुडली तो बगिचा आज दिसत नाही. याच वाड्यात जिजा यांचे लग्न ठरले. एका रंगपंचमीला गुलाल उधळला गेला. सोहळ्यात लखुजीराजे एक पिता म्हणून उपस्थित होते. पित्याच्या मायेने त्यांनी जिजा यांना मांडीवर घेतले. दुसऱ्या मांडीवर आपल्याच पदरी नोकरीत असलेल्या मालोजी भोसल्यांचे पुत्र शहाजी. रंगपंचमी जोरात सुरू आहे आणि गमतीने लखुजीराजे बोलून गेले, “जोडा किती नामी दिसतोय?” लखुजी जाधवांचे ते बोल खरे ठरले. मालोजी व लखुजी नात्यात बांधले गेले. हा सर्व इतिहास याच जागेत घडला. नाते जुळले व वाड्यावर उत्साहाचा उत्सव सुरू झाला. तो कित्येक दिवस चालला. सिंदखेडची कन्या दौलताबादेस आली. वेरुळकर भोसल्यांची ती सून झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात हे असे नाते निर्माण झाले. जिजा मराठवाड्यातून येऊन थडकल्या त्या पुण्याच्या शिवनेरीवर, पण महाराष्ट्राचे भाग्य जन्मास आले ते सिंदखेडच्या याच लखुजीराजेंच्या वाड्यात. सिंदखेड्यात जी जिजा होती ती शिवनेरी आणि रायगडावर जाऊन राजमाता झाली. या राजमातेचा जन्म जिथे झाला त्या सिंदखेडच्या वाड्याच्या एका बुरुजावर उभा राहून मी हे ‘शिवसंभव’ नाट्य जणू अनुभवत होतो. जे कधीच शक्य नव्हते असे स्वप्न याच वाड्यात जन्मास आले व वाड्याच्या बुरुजांवरून पुढे गेले. स्वाभिमानी लखुजीराजे जाधव लांब लांब पावले टाकीत त्या वाड्याच्या मुख्य चौकात येरझारा घालीत आहेत व लहान जिजा आपल्या शूर पित्याच्या झुपकेदार मिशा, कमरेवरच्या तलवारीकडे कौतुकाने पाहत आहे, असे चित्र डोळ्यांसमोर तरळले. आज तेथेच लखुजीराजेंची भव्य समाधी आहे. जावई शहाजीराजांना स्वातंत्र्याची तळमळ होती. पण त्यांच्या धडपडीस यश येत नव्हते. मुलगी जिजा यांना महाराष्ट्राचा राजा घडवायचा होता, पण पराक्रमी लखुजी जाधव हे स्वप्न पाहण्याआधीच निजामशाहीच्या मारेकऱ्यांचा बळी ठरले व तेथेच विसावले. त्यांच्या समाधीवरून सुकलेली पाने उडताना मी पाहिली. दिल्ली-विजापूरच्या मोगलांच्या चाकरीत महाराष्ट्राचे शूर सरदार राहिले. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ऊर्मी होती, पण जिद्दीने उभे राहिले ते शिवाजीराजे. त्या शिवाजीराजांचे पराक्रमी आजोबा याच वाड्याच्या प्रांगणात विसावले. तो वाडा आज त्या अर्थाने वाडा राहिलेला नाही. शिवबांच्या मातेचा जन्म जिथे झाला तिथे एक मंदिर उभे आहे. बाकी सर्व उजाड व रखरखीत.

मातृतीर्थ!

सिंदखेड राजामधील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ हे मातृतीर्थ आहे, पण त्याचे महत्त्व टिकवायला हवे तसे टिकवले गेलेले नाही. भावनेचा ओलावा नसलेले व इतिहासाचे भान नसलेले पुरातत्व खाते अशा ऐतिहासिक स्थळांची देखरेख करते, पण त्या देखरेखीत रुक्षपणा आहे. सिंदखेडला मी गेलो तेव्हा मला तिथे काय दिसले? गावाचा तो जुना काळाकोट कायम आहे. राजमहालासमोरच्या विस्तीर्ण पटांगणातील दीपमाळ अजून उभी आहे. बाहेर एक बगिचा आता झाला, पण आतमध्ये शिरताना काटे व झुडुपे आहेत. वाडा आजही भव्य आहे. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन भागांत विभागलेले आहे. खाली देवड्या, मध्ये नगारखाना व त्यावर सज्जा. लखुजीराजे किंवा त्यांची मुले वाड्यात प्रवेश करत किंवा वाड्यातून बाहेर पडत तेव्हा नगारे वाजवले जात. मुख्य प्रवेशद्वारावर आजही 14 नारळांचे तोरण स्पष्ट दिसते. हे 14 नारळ दगडात कोरले आहेत. नारळाचे तोरण म्हणजे समृद्धी, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक. हे सर्व लखुजीराजेंच्या निमित्ताने वाड्यात वावरत राहील. लखुजींचा हा वाडा 16 व्या शतकातला. मराठा स्थापत्याचे उत्तम उदाहरण. तेथे आधी मातीच्या भिंती होत्या. आज विटांच्या भिंती उभ्या आहेत. कधीकाळी येथे म्हाळसा महाल होते. दरबारी महाल होते. म्हाळसा लखुजींच्या पत्नी, म्हणजे जिजाऊंच्या माता. त्यांच्या नावाने हा महाल उभा राहिला. महाल दोन मजल्यांचा होता. खाली दगडी बांधकाम, वर सागवानी लाकडाचे बांधकाम. त्या वैभवाच्या महालात छोटी जिजा आनंदाने वावरली, वाढली व एक भव्य स्वप्न घेऊन शिवनेरीवर गेली. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात पवित्र वास्तू हीच आहे. रायगडाच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ यांची समाधी आजही आहे, पण सिंदखेड राजातील महालाच्या पायऱ्यांवर, ओटय़ांवर, देवडय़ांवर जिजाऊंच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. महाराष्ट्राच्या राजमातेचे भव्य स्मारक इथेच व्हायला हवे होते. राजमहाल व रंगमहाल या दोन वास्तूंची जपणूक करून बाजूला सुंदर हिरवळ तयार करण्यात आली होती. ती आज दिसत नाही. एखाद्या पडिक जागेत जावे तसे आत शिरल्यावर वाटते. ज्या मातेने महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून बाल शिवाजीकडून सोन्याच्या नांगराने नांगरणी केली, तिच्या जन्मस्थानावर महाराष्ट्राने सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवे. वाड्यातील खोल्या या तळघराप्रमाणे आहेत. ओळीने अनेक खोल्या आहेत. आत शिरले की गोंधळ होतो. तेथील प्रसन्नता साफ लोपली आहे. वाड्याच्या भिंती आणि कमानींची पडझड झाली आहे. सिंदखेड राजाचे पावित्र्य गंगा-गोदावरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राला जिवंत करणारा इतिहास घडला तो याच वास्तूत. येथे एक माता जन्मास आली. तिने महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक स्वाभिमानी राजा दिला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न याच जागेत जन्मास आले व त्या स्वप्नांची मशाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली, त्या सिंदखेड राजाला मला जाता आले ते श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर. उद्धव ठाकरे लखुजीराजे जाधवांच्या वाड्यात गेले तेव्हा तेही रोमांचित झाले, पण महाराष्ट्रास रोमांचित करणारा या वाड्याचा इतिहास जतन करायला हवा असे कुणाला का वाटू नये? फक्त लखुजी जाधवरावांचा वाडाच नव्हे तर सिंदखेड राजाचा संपूर्ण परिसरच विकसित करण्याची गरज आहे.

जिजाऊ मातेचे जन्मस्थळही आपण जतन केले नाही, तर इतिहास माफ करणार नाही. छत्रपती शिवरायांचे नाव तरी का घेता? हा सवाल उद्याची पिढी विचारेल. त्यांना उत्तर काय देणार?

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]