रोखठोक – महाराष्ट्रात उद्या काय होईल?

7991

rokhthok21 तारखेला महाराष्ट्र निवडणुकांना सामोरा जात आहे. पुढल्या चोवीस तासांत इतिहास बदलू शकतो, पण 24 तारखेनंतर भूगोल बदलू नये. त्यामुळे ‘युती’त असूनही शिवसेना एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत आहे. निवडणुकीस कुणाचे आव्हान नाही, असे मुख्यमंत्री सांगतात. तरीही पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी एकूण 40 सभा महाराष्ट्रात घेतल्या.

2019 ची उद्या होणारी निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी आहे. 370 कलम, राममंदिर असे राष्ट्रीय विषय राज्यांच्या विधानसभा प्रचारात फारसे आले नव्हते. या वेळी महाराष्ट्राच्या प्रचारात ते अग्रक्रमाने आले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातील सर्व प्रश्न गेल्या पाच वर्षांत मार्गी लागले असे नाही, पण आता निवडणुका मुद्द्यांवर नाहीत तर भावनिक प्रश्नांवर लढवल्या जातात. राममंदिर, समान नागरी कायदा हे विषय लोकसभा निवडणुकीत होतेच.

370 कलम अमित शहा यांनी हटवले आहे. हा देशाचा विषय. पण महाराष्ट्राच्या विधानसभा प्रचारात 370 कलम, राममंदिर आले आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांना हे विषय राज्याच्या निवडणुकांत मान्य नाहीत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांचा तिढा या प्रश्नांभोवतीच पडला. दुसऱया बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 10 रुपयांत जेवण, एक रुपयात आरोग्य तपासणी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 रुपये हे मुद्दे घेऊन उभे राहिले. कोणी तरी राज्याच्या आणि लोकांच्या प्रश्नांवरही बोलायला हवेच! मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षे राज्य केले. त्यांचे सरकार स्थिर राहिले. राज्य केले, पण राज्याला काय दिले? याचा कस उद्याच्या मतदानात लागेल.

धुरा पवारांवरच!

sharad-pawar-rokhthok
काँग्रेस पक्षाला राज्यात नेतृत्व उरलेले नाही. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील, विलासराव देशमुखांनी नेतृत्व केलेला काँग्रेस पक्ष हाच काय? त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांच्या प्रचाराची धुरा 80 वर्षांचे शरद पवार सांभाळत आहेत. फडणवीस, मोदी व शहा यांच्या विरोधात दमदार बॅटिंग करीत श्री. पवार यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. महाराष्ट्रात दोन नेत्यांच्या सभांना या वेळी सगळ्यात जास्त गर्दी झाली. पहिले श्री. उद्धव ठाकरे व दुसरे श्री. शरद पवार. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभा तर होणारच व त्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामास लागते. यावर विचार व्हायला हवा. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐन निवडणुकीत फोडला. त्यामुळे पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी 80 वर्षांचा नेता उभा राहिला. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे. आयाराम – गयाराम प्रवृत्ती लोक सहसा स्वीकारत नाहीत. पक्ष बदलणाऱयांना निवडणुका सहज जिंकता येत नाहीत.

ते संधीसाधूच असतात. शिवसेना किंवा भाजपातून बाहेर पडलेल्यांविरुद्ध जसा रोष असतो तसाच रोष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांच्या विरोधात असू शकतो. हा रोष आणि नाराजी काय असते त्यासाठी साताऱयात उदयनराजे भोसले व अकोल्यात पिचड यांच्याबाबतचे वातावरण पाहायला हवे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सगळय़ात जास्त पक्षांतरे या निवडणुकीत झाली. संपूर्ण विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षात विलीन करून घ्यायचा व विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही हे धोरण उलटू शकते. कारण शेवटी महाराष्ट्राची परंपरा लढणाऱयांची आणि बंड करणाऱ्यांची आहे. या बंडाच्या ठिणग्याही महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघांत दिसत आहेत. शिवसेना आणि भाजप एकत्र लढत आहेत, पण किमान 37 मतदारसंघांत शिवसेना-भाजपचे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांविरोधात ताकदीने लढत आहेत. याचे कारण महाराष्ट्रात ‘युती’ झाली. शिवसेना 124 जागांवर लढत आहे. भाजपने मित्रपक्षांना गुंडाळून 164 जागा पटकावल्या. मात्र दोन्ही बाजूंनी आधी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली होती. त्या तयारीवर ऐन वेळेस पाणी पडले. पुन्हा अनेक जागांवर दोन्ही बाजूंकडे सक्षम उमेदवार असतानाही संधी मिळत नाही, म्हटल्यावर युती आणि विचार ठोकरून लोक स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतात. त्यांना बंडखोर म्हणणे मला मान्य नाही.

जरा हे पहा…
महाराष्ट्रातील उद्याच्या निवडणुकांचे वैशिष्ट्य काय?
1) शिवसेना-भाजप युती नक्की निवडून येत आहे. त्यामुळे चुरस संपली आहे.
2) मुख्य विरोधी पक्ष कोणता राहील, इतकाच प्रश्न आहे. विरोधी पक्ष इतका हतबल इंदिरा गांधींच्या सुवर्ण काळातही झाला नव्हता.
3) राज ठाकरे हे सभा घेत आहेत. काही मतदारसंघांत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी संधान बांधले. त्यांच्या सभांना गर्दी लोकसभा निवडणुकीत झाली. विधानसभेसाठी ती झाली तरी मतांत रूपांतर होणे कठीण आहे.
4) शरद पवारांनी इतक्या आक्रमकपणे प्रचार कधीच केला नव्हता. महाराष्ट्राचा हा जाणता राजा हमरी-तुमरीवर आणि ‘उपटण्या’ची भाषा करीपर्यंत पोहोचला; कारण राज्यातला माहोल बदलला आहे व पवारांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे.
5) बेळगाव सीमा प्रश्न, महाराष्ट्राची अस्मिता, मुंबईतल्या मराठी माणसाचे प्रश्न यावर ‘मौन’ बाळगणारी ही गेल्या 60 वर्षांतली पहिलीच निवडणूक आहे.
6) भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला कमी जागा दिल्या. भाजपने त्यांच्या मित्रपक्षांनाही कमळ चिन्हावर लढायला लावले. त्यामुळे भाजप कमळावर 164 जागा लढवत आहे.
ही मित्रपक्षांची फसवणूक असल्याची खंत स्वतः महादेव जानकर यांनी व्यक्त केली. 164 पैकी 144 जागा जिंकाव्यात असे भाजपला वाटते व 124 पैकी शंभरावर जागा जिंकू असे शिवसेनेस वाटते. या सगळय़ा आकडय़ांमध्ये शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कोठे उभा आहे!
7) नारायण राणे यांनी मुलांसह भाजपात प्रवेश केला. कणकवली मतदारसंघात त्यांचे पुत्र भाजपचे कमळ हातात घेऊन उभे आहेत. तेथे ‘युती’ असूनही शिवसेनेने अधिकृत उमेदवार उभा केला. सतीश सावंत यांनी धनुष्यबाण ही निशाणी घेऊन राणेंविरुद्ध बंड पुकारले आहे.
8) ‘युत्या’ आणि ‘आघाडय़ा’ दोन्ही बाजूने आहेत. पण अविश्वासाचे धुके तितकेच गडद झाले. 24 तारखेला दुपारी या धुक्यातून कोण कोणत्या मार्गाने जातो ते कळेल.

आदित्य ठाकरे

aaditya-thackeray
आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले व त्यांची निवडणूक राज्याचा राजकीय इतिहास बदलणारी ठरेल असे वातावरण आज आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढत आहेत ते काही विधानसभेत जाऊन फक्त आमदार म्हणून बसावे म्हणून नाहीत. राज्याचे नेतृत्व त्यांनी करावे अशी महाराष्ट्राच्या नव्या पिढीची इच्छा आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण हे त्यामुळे 24 तारखेलाच कळेल! राज्यातले चित्र शिवसेना-भाजप युतीसाठी आशादायक आहे. मुख्यमंत्री सांगतात, युतीला आव्हान देणारे पहेलवान रिंगणात नाहीत, लढायचे कुणाशी? हा प्रश्न त्यामुळे आहे. पण आव्हान आहेच. म्हणून पंतप्रधान मोदी यांना 10 व गृहमंत्री अमित शहा यांना 30 सभा घ्याव्या लागल्या. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना 100 सभा का घ्याव्या लागल्या? हा प्रश्न श्री. शरद पवार यांनी विचारला, तो चुकीचा नाही. महाराष्ट्राची लढाई मोठी आहे म्हणून दिल्लीचे नेते महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. काँग्रेस राजवटीत मुंबई-ठाण्यातील हिंदी भाषिक मते वळविण्यासाठी येथे लालू यादव, मुलायम यादव येत. उत्तर प्रदेश, बिहारचे मंत्री येत म्हणून त्यांच्यावर टीका होत असे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात व भाजपसाठी प्रचार करतात. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही मुंबईत येऊन थांबले. शेवटी हिंदी भाषिक मते इकडे-तिकडे जाऊ नयेत व ‘हिंदू’ म्हणून ती युतीच्याच पारड्यात पडावीत यासाठी हे प्रयोजन. ‘लढाई’ आहेच. म्हणून ही सर्व तयारी ‘महायुती’स करावी लागली. शिवसेना ‘युती’त राहूनही शेवटी एकांड्या शिलेदारासारखी लढत आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे. या राज्याचा भूगोल 24 तारखेनंतर कोणी बहुमताच्या जोरावर बदलू नये म्हणून हाच एकांडा शिलेदार लढत आहे. महाराष्ट्र त्याचे स्मरण ठेवील!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या