रोखठोक – कोण कुणाचा पराभव करणार?

5175

rokhthokविधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या निवडणुकीचे वैशिष्टय़ असे की, कोण कुणाचा पराभव करणार हे निश्चित झालेले नाही व हे रहस्य शेवटपर्यंत राहील.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आता सज्ज झाले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, कोण कुणाचा पराभव करणार हे निश्चित झालेले नाही व हे रहस्य शेवटपर्यंत राहील. लोकसभा निवडणुकीत  शिवसेना आणि भाजपच्या विधानसभा जागावाटपाचाही ‘फॉर्म्युला’ ठरल्याचे दोन्ही बाजूंनी श्री. अमित शहा यांच्या उपस्थितीत सांगितले व हा फॉर्म्युला ‘50-50’ टक्के असा होता. प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाटय़ाला 124 जागा आल्या. 288 च्या रचनेत अर्ध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे (आणि भाजपचेही) उमेदवार नसतील. ‘एकदा भरकटत गेलो की पुन्हा परतता येणार नाही,’ असे बोलले जाते. लोकसभेच्या वेळेस विधानसभाही झाल्या असत्या तर जागावाटपाचे चित्र वेगळे दिसले असते हे स्पष्टपणे सांगायला काहीच हरकत नाही. युती आणि आघाडय़ांत हे नेहमीच घडत आले. गोव्यात आधी महाराष्ट्रातून गोमंतक पक्षाबरोबर भाजपने युती केली. पहिल्या वेळी म. गो. पक्षाने भाजपसाठी चार जागा सोडल्या. नंतर हा आकडा वाढला. पुढे समसमान झाले. मागच्या निवडणुकीत म. गो. प. आणि भाजप स्वतंत्र लढले. म.गो.प.चे फक्त तीन उमेदवार निवडून आले.  त्यातील दोघे मंत्री झाले. कालांतराने एक मंत्री आणि एक आमदार भाजपवासी झाले. त्या दोघांना मंत्री करून उपमुख्यमंत्री असलेल्या म.गो.प.च्याच सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे म.गो.पक्ष फक्त ढवळीकर बंधूंपुरताच उरला. अर्थात, पुढे काँग्रेसच्या दहा आमदारांनाही भाजपने आपल्यात घेतले आणि एका अपक्ष आमदाराच्या मदतीने स्वतःचे सरकार भक्कम केले. आज कोणाच्याही टेकूशिवाय गोव्यात भाजपचे सरकार सुरू आहे. पक्षविस्तार व स्वतःचे सरकार आणण्यासाठी कोणत्याही टोकाच्या भूमिकेपर्यंत कसे जावे हे भाजपकडून शिकायलाच हवे. महाराष्ट्रात शिवसेनेची पाळंमुळं खोलवर जमिनीत रुतली आहेत व ती उपटणे शक्य झालेले नाही. झाडावरची पाने उपटली तरी मुळे मजबूत आहेत आणि पानांचा बहर पुनः पुन्हा येईल हे वास्तव आहे!

आदित्य रिंगणात!

श्री. बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कोणत्याच निवडणुकीत उभे राहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा निवडणूक लढवली नाही, पण आता आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न संपला आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा निवडणुका लढवू नये या मताचे ते होते, पण संसदीय लोकशाहीच्या रिंगणात त्यांना उतरावे लागले. अर्थात ते स्वतः निवडणुकांपासून लांब राहिले, मात्र पक्षावर आणि सरकारवर त्यांचे संपूर्ण नियंत्रण होते. बाहेर राहून संघटना चालवणे ही एक गोष्ट आणि सरकार चालविणे ही दुसरी गोष्ट. आदित्य ठाकरे यांनी सरकार चालविण्याची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्र त्यांचे स्वागत करेल. आदित्य ठाकरे हे लहान आहेत व त्यांना शेतकऱयांचे प्रश्न समजणार नाहीत, अशी टीका आज जे करतात त्यांनी अनुभवाच्या बळावर शेतकऱयांचे किती प्रश्न सोडवले याचे आधी उत्तर द्यावे. एक तरुण बाहेर राहून तरुणांच्या व शेतकऱयांच्या प्रश्नांवर बोलतो त्याने विधिमंडळात जाऊन काम केले तर अनेक प्रश्नांची उत्तरे सुटतील.

विचार कोणता?

महाराष्ट्राला विचार राहिला आहे काय? राज्याच्या निवडणुका कोणत्या विचारावर लढल्या जात आहेत? यावर कोणाकडेच उत्तर नाही. ‘‘पाप फार झाल्याने सांगली-कोल्हापुरात महापूर आला. देवाची अवकृपा झाली,’’ असा प्रचार कुणी तरी बुवा पूरग्रस्त भागात करीत असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. यापैकी ‘पाप फार झाले आहे’ हे खरे आहे, परंतु त्यामुळे निसर्गाचे तांडव झाले नाही. देशात आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. लोकांनी नोकऱया गमावल्या, यात देवाची अवकृपा कोठे आली? राज्यात शिखर बँकेचा घोटाळा उघड झाला. यात देव कोठे आले? 135 शाखा असलेल्या ‘पीएमसी’ बँकेत कर्ज घोटाळा झाला व रिझर्व्ह बँकेने त्या बँकेवर कारवाई केली. त्यात लाखो गरीब खातेदारांचे जीवन उद्ध्वस्त झाले. यात देवाची अवकृपा झाली हे कसे म्हणायचे? बँक ऑफ बडोदा देशभरातील 900 शाखा बंद करत आहे. 5000 कर्मचारी नोकऱया गमावतील. अर्थात हे सर्व मुद्दे प्रचारात येणार नाहीत व 370 कलम, पाकिस्तान यावरच भर दिला जाईल. महाराष्ट्राचे राजकारण व राज्यातील भाजपवर आज संपूर्ण नियंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. नागपुरातील तिकीटवाटपही फडणवीस यांच्या मताप्रमाणे झाले. श्री. एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली गेली. चौथ्या यादीत त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले असले तरी शेवटी ‘बूँद से गयी वो हौदसे नहीं आती’ हेच खरे. विनोद तावडे यांनाही उमेदवारी दिली गेली नाही. प्रकाश मेहता यांना दिल्लीचा आशीर्वाद असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. फडणवीस यांना मानणाऱयांनाच तिकिटे मिळाली. उद्याचा मुख्यमंत्री ‘मीच व पुनः पुन्हा मीच’ हा आत्मविश्वास त्यातूनच निर्माण झाला.

जागावाटप कसे?

शिवसेना-भारतीय जनता पक्ष आज एकत्रित निवडणुका लढत आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांत शिवसेनेस प्रतिनिधित्व मिळाले नाही. नागपूर, पुणे, नाशिक, नवी मुंबई अशा मोठय़ा महानगरपालिका क्षेत्रांत शिवसेनेला एकही जागा सुटलेली नाही. हीच स्थिती काही भागांत भाजपच्या बाबतीत झाली आहे. रत्नागिरीत भाजपला जागा नाही. नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसता तर सिंधुदुर्गातही भाजप कोरीच राहिली असती. कोल्हापुरातही भाजपास जागा नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढण्यासाठी पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात यावे लागले. 124 पैकी शंभर जागा जिंकण्याचे ध्येय ठरवले तर महाराष्ट्रात सत्तेचे वाटप त्याच पद्धतीने होईल, हे शिवसेनेवर टीका करणाऱयांनी समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राच्या निवडणुका एकतर्फी होणार नाहीत व 21 तारखेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले दिसेल. ‘औसा’ मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पी.ए.ला उमेदवारी दिली. त्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व नागपुरातील शेकडो  बंडोबा नितीन गडकरी यांच्या दारासमोर गेले. हे पहिल्या टप्प्यातले चित्र आहे. मी पुन्हा येत आहे, असे आमचे मुख्यमंत्री सांगत आहेत. पुन्हा कोण येईल, ते जनतेने ठरवायचे!

कुणाचाही कुणावर विश्वास नाही. एकत्र असूनही प्रत्येक जण स्वतःच्या चालीने पुढे निघाला आहे. अशा वातावरणात निवडणुका होत आहेत. त्यामुळे आज जे राजकीय अंदाज बांधत आहेत त्यांनी थोडे थांबायला हवे, पण राजकारणात कोणी कुणासाठी थांबत नाही. सध्या तरी हेच चित्र आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या