रोखठोक – श्रीरामाची अयोध्या; अयोध्येतील हनुमान, शरयूतीरी हिंदुत्वाचा झगमगाट!

श्रीरामांना जननी व जन्मभूमी प्रिय होती. अयोध्येची 500 वर्षांची लढाई त्या जन्मभूमीसाठीच होती. ती आता संपली. भव्य मंदिर उभे राहत आहे. बाजूला श्री हनुमानजी आहेतच, पण देशातले वातावरण हिंदू-मुसलमानांत विभागले. श्रीरामांना ते मान्य झाले असते काय? हनुमानाची गदा देशफोड्यांच्या डोक्यावर बसेल काय?

‘जननी आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे’ असे सांगणाऱ्या राजा श्रीरामांच्या अयोध्येत तीन दिवस होतो. गेल्या 30 वर्षांत मी अनेकदा अयोध्येत गेलो, पण आता अयोध्येचे स्वरूप पूर्ण बदलताना दिसत आहे. लखनौ ते अयोध्या आणि वाराणसी ते अयोध्या असे उत्तम रस्ते आता झाले. अयोध्येच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटींचा निधी खर्च होत आहे. अयोध्येच्या व आसपासच्या जमिनींना ‘चंद्र आणि मंगळा’वरील जमिनीचा भाव आला आहे. जो राजा श्रीराम पित्यास दिलेल्या वचनास जागून, राज्याचा त्याग करून सरळ वनवासात गेला तो राजा देशभरातील गरीबांचा देव. पंढरपूरचा विठोबा तसा अयोध्येचा राम. त्या अयोध्येत आता राममंदिराच्या रूपाने स्वर्गाची निर्मिती होत आहे. अयोध्येत गेल्या 500 वर्षांपासून श्रीरामजन्मभूमीचा वाद सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाने 1045 पानांचे निकालपत्र दिले. रामजन्मभूमीवर हिंदूंचाच अधिकार असल्याचे मान्य केले. एक विश्वस्त मंडळ बनवून मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाले. एका भव्य लढाईचा हा असा चांगला शेवट झाला.

श्रीराम भारतीय संस्कृतीचे प्रतीक. भारतवासीयांचे ते जीवन. श्रीरामजन्मभूमी हा मंदिर-मशिदीचा झगडा नाही. मंदिर तर कोठेही बांधता आले असते. मशीदही कोठेही बांधता येईल, पण जन्मभूमीचे स्थान बदलता येत नाही. पुन्हा ती अशी जन्मभूमी, जेथे साक्षात श्रीरामाने जन्म घेतला!

पुन्हा अयोध्या दर्शन!

श्री. आदित्य ठाकरे एक दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आले व त्यानिमित्त संपूर्ण अयोध्या पुन्हा पाहता आली. प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन, हनुमान गढीचे दर्शन व संध्याकाळी माता शरयूची आरती. हिंदू धर्मातील अध्यात्म म्हणजे काय ते शरयूच्या आरतीचे नयनरम्य रूप पाहून समजले. श्री. आदित्य ठाकरे यांनी हजारोंच्या उपस्थितीत माता शरयूची आरती केली तेव्हा शरयूचा घाट फुलांनी व दिव्यांनी सजवला होता. शरयूच्या पात्रात 5100 पणत्या सोडल्या. त्या शांत प्रवाहात वाहतानाचे दृश्य नेत्रदीपक असते. नदीतील बोटीतही भक्त आरतीचा आनंद घेतात व संपूर्ण शरयू माता नव्या अवतारात प्रकट होते. 12, 13, 14 जून हे तीन दिवस शरयूचे जयंती उत्सवाचे दिवस. शरयूतटावर गीत, संगीत, अध्यात्माची त्रिवेणीच वाहत असते. याच शरयूतीरी श्रीरामांची अयोध्या नगरी वसली आहे.

शरयूतीरावर राम

श्रीरामांना शरयू सगळय़ात प्रिय होती. त्यांचे बालपण याच तीरावर गेले. शरयूच्या सर्व घाटांचे आता पुनर्निर्माण केले. हजारो भक्त येथे स्नान करतात, डुबक्या मारतात व शरयूचे पाणी गढूळ होते. शरयूचा उगम ब्रह्माच्या दवातून झाला. त्याच ब्रह्माने श्रीरामाच्या रूपात अयोध्येत अवतार घेतला आणि शरयूच्या कुशीत जीवन व्यतीत केले अशी कथा आहे. शरयूचे जल अत्यंत प्रभावी असल्याची श्रद्धा आहे. येथे पाप आणि आजार धुतले जातात अशी भावना आहे. रामकथांचा प्रवाह पिढ्यान् पिढ्या कसा पुढे जातो ते पहा. ब्रह्माच्या कठोर तपस्येने भगवान श्रीहरी द्रवले. त्यांच्या डोळय़ांतील आसवांना ब्रह्माने मानस सरोवरात नेले. त्याच तपस्वी थेंबांना ब्रह्मर्षी वशिष्ठ अयोध्येत घेऊन आले. भगवंतांच्या नेत्रांतून बाहेर पडल्यामुळे शरयूस ‘नेत्रजा’, तर वशिष्ठांकडून मानस सरोवरातून अयोध्येस आणल्यामुळे ‘वशिष्ठा’ म्हटले जाते. अशा अनेक रामकथांचे भांडार अयोध्येच्या मातीत दडले आहे. मी 13 तारखेस अयोध्येत पोहोचलो व शरयू घाटावर गेलो. तेव्हा लक्ष्मण घाटावर अडीच क्विंटल दुधाचा शरयू अभिषेक सुरू होता. दि. 12, 13, 14 शरयू महोत्सव व त्याच महोत्सवाचे दिवे पेटते ठेवून 15 तारखेस आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य आरतीचा सोहळा पार पडला.

आखाड्यांचे राजकारण

अयोध्येतील प्रत्येक मंदिर व आखाडा हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. धर्मकारणाबरोबर राजकारणाचेही ते आखाडे आहेत. त्या आखाडय़ातही वाद आहेत. हनुमान गढीस अयोध्येत विशेष महत्त्व आहे. अयोध्येच्या सर्व घडामोडीचे ते प्रमुख केंद्र. महंत ग्यानदास हे तपस्वी या गढीचे प्रमुख, पण तेथे शब्द चालतो तो खासदार बृजभूषण शरणसिंह यांचाच. ‘‘नेताजीच्या एका हाकेसरशी येथे लाखो लोक जमतील,’’ असे श्री. ग्यानदास महाराज म्हणाले. त्यांनी आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद दिले व बाळासाहेब ठाकरे हे नाशिकच्या कुंभमेळय़ात भेटल्याची आठवण सांगितली. संपूर्ण ठाकरे कुटुंबाने येथे दर्शनासाठी यावे. आम्ही त्यांचे स्वागत करू, असे ग्यानदासजी म्हणाले. बृजभूषण शरणसिंह व आदित्य ठाकरे यांच्यात दूरध्वनीवरून बातचित झाली हे महत्त्वाचे. हनुमान गढीच्या सर्व संत-महंतांनी आदित्य ठाकरेंना भरभरून आशीर्वाद देताना सगळय़ांनी पाहिले.

गढीचा इतिहास

श्री हनुमान मंदिर म्हणजे ‘हनुमान गढी’ हे अयोध्येतील प्रमुख मंदिर. मंदिर मोठे आहे. साठ पायऱ्या चढाव्या लागतात व फुलांनी आच्छादलेल्या श्री हनुमानजींचे दर्शन तेथे होते. हनुमान गढीचा इतिहास रंजक आहे. आज जे ‘हिंदू-मुसलमान’ अशा आगी लावण्याचे उपद्व्याप करीत आहेत त्यांनी हा इतिहास सर्वात आधी समजून घेतला पाहिजे. शेकडो वर्षांचा हा इतिहास. एकदा लखनौ आणि फैजाबादचा प्रशासक नवाब मन्सूर अलीचा मुलगा असाध्य रोगाने आजारी पडला. अनेक वैद्य, हकिमांच्या उपचारांनी तो बरा झाला नाही. आजार वाढत गेला तेव्हा नवाब हनुमान गढीच्या श्री हनुमानजींच्या चरणाशी आले. त्यांनी त्यांच्या मुलास हनुमानाच्या पायावर ठेवले व मुलगा आजारातून बरा झाला. तेव्हापासून नवाब हे हनुमानाचे भक्त झाले. श्रद्धावान नवाबाने हनुमानजींच्या जवळची 52 बिघा जमीन मंदिरास दान केली. साधूंच्या सुविधेसाठी भव्य फळबाग लावली. त्याच वेळी श्री. अभयरामदासजी यांच्याकडे विनंती करून हनुमानजींचे एक भव्य विशाल मंदिर बनवले, जे आता हनुमान गढीच्या नावाने विख्यात आहे. नवाबाच्या श्रद्धेतून हे मंदिर उभे राहिले. त्यामुळे आजही अनेक मुसलमान बांधव येथे श्रद्धेने येऊन पूजा करतात. अनेक मुस्लिम संत श्री हनुमानाच्या श्रद्धेतून कायमचे अवधवासी झाले.

ही अयोध्या वेगळी

दशरथांच्या वेळची अयोध्या नगरी वेगळी होती. तेव्हाच्या भाषेत ती बारा योजने लांब होती. नगरातील मुख्य ‘सडक’ मोठी होती. त्यावर रोज पाण्याचा शिडकावा होत असे. सडकेच्या दोन्ही बाजूस सुगंधित फुलांचे वृक्ष होते. आज ते चित्र नाही. आजची अयोध्या महाराज विक्रमादित्याने वसवली आहे. महाराज विक्रमादित्य देशाटन करत योगायोगाने शरयू किनारी आले. त्यांच्या सैन्याने तंबू टाकले तेव्हा तेथे फक्त जंगलच होते. प्राचीन तीर्थचिन्ह दिसत नव्हते. महाराजा विक्रमादित्यांना त्या भूमीतून आध्यात्मिक, धार्मिक कंप जाणवू लागले. त्यांनी शोध सुरू केला. आसपासच्या योगसिद्ध संतांकडून त्यांना समजले की, ही अवधभूमी आहे. श्रीरामांची जन्मभूमी आहे. महाराजांनी श्रीरामाची नगरी पुन्हा वसवली, पण मथुरेप्रमाणेच या भूमीवर पुनः पुन्हा आक्रमणे होत राहिली. ही सर्व आक्रमणे झेलून अयोध्या आज उभीच आहे.

विचारांचे काय?

अयोध्येत श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. 2024 च्या आधी हे मंदिर, म्हणजे राष्ट्राची अस्मिता उभी राहील. मंदिरातील विश्वस्त मंडळाचे सदस्य श्री. चंपत राय हे आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात उपस्थित होते. त्यांनी सर्व परिसर फिरवून दाखविला. जेथे मंदिर उभे राहत आहे, त्या प्रत्यक्ष जन्मभूमीवर ते घेऊन गेले. रामांचे गर्भगृह, जेथे प्रत्यक्ष श्रीराम विराजमान होतील त्या पवित्र जागी नेले. ते सर्वच रोमांचक होते. राम हे लोकाभिमुख व लोकाभिराम होते. राम हे असे सुंदर व लोभस व्यक्तिमत्त्व होते की, त्यांच्या दर्शनाने शत्रू शस्त्र उचलायचे विसरून जाईल. राम निःस्वार्थी होते, त्यागी होते, एकवचनी होते. राम सगळय़ांचेच होते. ते जननायक होते, स्वाभिमानाचे प्रतीक हाते. अयोध्येत भव्य मंदिर उभे राहील, पण लोकाभिराम श्रीरामाचे हे गुण कसे घेणार? हिंदू-मुसलमानांच्या झगडय़ात देश जळतो आहे. एका मुसलमान भक्ताने अयोध्येत हनुमानाचे मंदिर उभे केले. तो रामभक्त हनुमानही ही पेटवापेटवी पाहून अस्वस्थ असेल. त्याने रावणाची लंका पेटवली. इथे श्रीरामाचे राज्यच काही जण पेटवायला निघाले.

@rautsanjay61
 [email protected]