रोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट

rokhthokशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कालच झाला. खरं तर शिवसेनाप्रमुखांचे स्मरण रोजच होत असते. त्यांचे पुतळे, स्मारके निर्माण होतील. चित्रपट, पुस्तके प्रसिद्ध होतील, पण ज्या राजकीय व्यंगचित्रांनी त्यांना परखड, ज्वलंत ‘नेतृत्व’ मिळवून दिले त्या व्यंगचित्रांचे अमरत्व पुतळे व स्मारकांपेक्षा मोठे. एका कलावंताने देशाचे राजकारण मुठीत ठेवले व हवे तसे वळवले. त्या मागची ताकद कुंचल्याच्या फटकाऱ्यांत होती.

कलावंत मनाची माणसे राजकारणात रमत नाहीत, पण बाळासाहेबांनी जे क्रत स्वीकारले ते तडीस नेले. दक्षिणेकडील राज्यांत चित्रपट कलावंत राजकारणात उतरल्याचे दिसते व पडद्यावरील लोकप्रियता राजकारणात वापरून त्यांनी सत्ताही मिळवली. पण त्यांच्याकडून फार मोठे ऐतिहासिक किंवा राष्ट्रउभारणीचे कार्य झाल्याचे दिसत नाही. एम.जी.आर., जयललिता, करुणानिधी, एन. टी. रामाराव यांनी त्यांचा काळ गाजवला, पण ते आता देशाच्या विस्मृतीत गेले. रजनीकांत, कमल हसन वगैरे कलावंत मंडळी मोठे स्वप्न घेऊन राजकारणात उतरली आहेत, पण त्यांची पडद्यावरची लोकप्रियता हाच राजकारणातला आधार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा वेगळी होती. ते कलावंत होते, पण त्यांच्या हातात फक्त कुंचला होता. संगीतकार, गायक, चित्रकारांनी राजकारणात येऊन शिखर गाठावे हा चमत्कार ठरतो, पण कुंचला हेच हत्यार बनवून बाळासाहेबांनी क्रांती केली! त्यांची दृष्टी व विचारशक्ती अफाट होती. त्यांची अनेक जुनी व्यंगचित्रे पाहताना असे वाटते की, फक्त माणसे बदलली. त्यांच्या प्रवृत्ती, स्वभाव आणि भूमिका त्याच आहेत. मुख्य म्हणजे व्यंगचित्रांच्या माध्यमांतून बाळासाहेबांनी केलेले भाष्य आजही चपखल बसते. 1978 चे एक व्यंगचित्र आहे. ते इंदिरा गांधींवर असले तरी आजच्या परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा चेहरा इंदिरा गांधींच्या जागी फिट बसतो. इंदिरा गांधींचे नेतृत्व लोकप्रिय होते, पण त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती, एकाधिकारशाही व हट्टी स्वभावामुळे अनेक नेते दूर गेले.

 balasaheb-cartoon-1

त्यात यशवंतराव चव्हाणदेखील होते. एका चित्रात व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी इंदिराजींच्या दोन प्रतिमा दाखवल्या. एक लोकप्रिय नेतृत्व असलेल्या इंदिराजी, तर दुसरी हेकेखोर, हम करे सो कायदा पद्धतीने वागणाऱ्या इंदिराजी. या दोन्ही प्रतिमांकडे पाहून यशवंतराव सांगतात, ‘तुमचे आमचे वैयक्तिक भांडण काही नाही, मात्र त्या बाईशी समझोता अशक्य!’ मी इंदिरा गांधींच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी यांचा चेहरा लावला. बाळासाहेबांनी केलेले भाष्य तेच.

काय बदलले?

राजकीय व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांनी जे ‘फटकारे’ मारले ते अजरामर आहेत. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत आली, पण काय बदलले आणि काय बदलले नाही हे पाहायचे असेल तर बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहावी लागतील. पंडित नेहरूंनी सार्वजनिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले, पण बडय़ा भांडवलदारांचे हित पाहणाऱ्या सरकारी लॉबीने सार्वजनिक उपक्रमांचे अस्तित्वच संपवण्याचे कारस्थान सुरू केले. बडे भांडवलदार व त्यांचे खासगी उद्योग टरटरून फुगू लागले व सार्वजनिक उपक्रम मरू लागले. यावर ‘Private Business’ असे टोकदार व्यंगचित्र ‘फ्री प्रेस’मध्ये रेखाटले. बडय़ा भांडवलदारांची ‘शेठगिरी’ गरागरा फुगत असताना सार्वजनिक उपक्रमांची वाताहत त्यात दिसली. आज ‘राफेल’चे कंत्राट कोणताही अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीस दिले. त्यामुळे ‘एचएएल’ हा सार्वजनिक उपक्रम मरण पावला व चार हजार कामगार बेकार झाले. ‘Private Business’ आजही जोरात सुरूच आहे.

भक्कम पाया

बाळासाहेब ठाकरे हे राजकीय नेते म्हणून थोर होते. कारण राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा पाया भक्कम होता. संघ परिवाराचे नेते आज मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करतात.

balasaheb-cartoon-2

हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा असा सल्ला देत असतात. हिंदू लोकसंख्येच्या कुपोषणावर व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी 1963 सालीच ‘मार्मिक’ टोला हाणला. बाहुबली मुसलमानाच्या आडदांड देहापुढे किरकोळ हिंदू टक्कर मारीत असल्याचे चित्र आजही तितकेच सत्य वाटत आहे. बाळासाहेबांची व्यंगचित्र कला उत्स्फूर्त होती. कोणत्याही ‘स्कूल’ आणि ‘इझम’ची शाई त्यांच्या कुंचल्यात नव्हती. त्यांची व्यंगचित्रेही स्वभावाप्रमाणेच स्पष्टवक्ती होती. व्यंगचित्रांचा परखडपणाच त्यांच्या नेतृत्वात आला व शब्दांच्या फटकाऱ्यांनी देश रोमांचित झाला. व्यंगचित्रकारांनी भल्या भल्या हुकूमशहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला आहे. डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांमुळे हिटलर हैराण झाला होता. डेव्हिड लो यांना जिवंत अथवा मेलेला हजर करण्याचे फर्मान हिटलरने काढले होते. 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते, असे बाळासाहेब सांगत ते खरेच होते.

‘झुला’ तोच

balasaheb-cartoon-3

सीमा प्रश्नाचा ‘झुला’ झाला आहे, असे बाळासाहेबांचे व्यंगचित्र आजही जिवंत वाटते. झोपाळय़ाच्या दांडक्यावर भिजत घोंगडय़ाप्रमाणे वाळलेला मराठी माणूस सीमा प्रश्नाचे प्रतीक म्हणून लटकत आहे, असे भाष्य 1963 सालाचे होते. हा झुला आजही तसाच आहे. शरद पवारांनी सोनिया गांधींना विदेशी वंशाच्या म्हणून विरोध केला. काँग्रेस सोडली. पुन्हा सत्तेसाठी सोनिया गांधींबरोबर गेले. हा पवारांचा राजकीय स्वभाव दाखवणारे व्यंगचित्र जनता पक्षाच्या काळातील आहे. यशवंतरावांनी ‘जनता पक्ष’ हा प्लेगचा उंदीर असल्याचे जोरदार भाष्य केले. पण त्यांचे ‘चेले’ शरद पवार यांनी यशवंतरावांचाच आशीर्वाद घेऊन जनता पक्षाबरोबर संगनमत केले व मुख्यमंत्री पद मिळवले. यावर बाळासाहेबांनी मस्त ‘टोला’ मारला. यशवंतराव हातात काटे-चमचे घेऊन जेवणाच्या टेबलावर बसले आहेत. डिशमध्ये ‘तंदूर उंदीर’ आहे व यशवंतराव खुलासा करीत आहेत, ‘होय, मीच जनता पक्ष हा प्लेगचा उंदीर आहे म्हणून हाळी देण्यास सांगितले होते, पण शरदने तो उंदीर असा काही उकडलाय की त्याची चव घेऊन बघाच!’

ढोंगावर प्रहार

आसाम, त्रिपुरा, कश्मीर, महागाई, भ्रष्टाचार, मराठी माणूस अशा अनेक विषयांवर व्यंगचित्र रेखाटणारे बाळासाहेब हे कलावंतच होते. जोपर्यंत जातीय व धार्मिक सवलती दिल्या जात आहेत तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता म्हणजे ढोंग आहे, हे चित्र त्यांनी रेखाटले. आज त्याच ‘सवलत’बाज राजकारणाने महाराष्ट्रात आणि देशात अराजक निर्माण केले आहे. मोदी आज जगभर फिरत आहेत. भाषणे देत आहेत, पण लोक उपाशी आहेत. 1965 साली यावर बाळासाहेबांच्या कुंचल्याने फटकारले.

balasaheb-cartoon-4

जमीन दुभंगली असून सापळा झालेली जनता जमिनीच्या भेगांत अडकून आक्रोश करीत आहे- ‘सत्कार, भाषणे, चैन, मेजवान्या, परदेश दौरे, हवापालट याखेरीज केलेत काय गेल्या 18 वर्षांत?’ तडकलेल्या जमिनीच्या दुसऱ्या भागावर केंद्रीय  राज्यकर्ते उभे आहेत. तेव्हा स्वातंत्र्याला 18 वर्षे झाली होती. आज 70 वर्षे झाली. तडकलेल्या जमिनीच्या भेगांत अडकलेला सामान्य माणूस तोच आहे. राज्यकर्ते बदलले. व्यंगचित्र व त्यातील आशय ताजा व तितकाच ज्वलंत आहे. स्वातंत्र्याने आम्हाला दिले काय? हा प्रश्न तेव्हा आणि आजही कायम आहे. बाळासाहेबांचे फटकारे अमर आहेत. त्यांचे स्मरण करताना हे सर्व सहज आठवले.

< Twitter- @rautsanjay61, Email- rautsanjay61@gmail.com >