रोखठोक – 4 जूननंतरची मोक्षप्राप्ती!

नरेंद्र मोदी यांनी देशावर पुतीनप्रमाणे राज्य केले. देशाला गुलाम केले दहा वर्षांत गुलाम जन्माला घातले. प्रश्न इतकाच आहे की, पराभव झाला तर मोदी हे सत्ता सोडतील काय? की एखाद्या हुकूमशहाप्रमाणे सत्ता सोडण्यास नकार देतील?

नरेंद्र मोदी व अमित शहा यांची राजवट 4 जूननंतर संपत आहे याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले. मोदी व शहा यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी-शहांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण केले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही, पण मोदी हवेत. “माती खाऊन जगू” असे बोलणारे अंधभक्त या काळात दिसले, पण ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले. त्यांनी देशाला गुलाम केले व दहा वर्षांत गुलाम जन्माला घातले. तरीही गुलाम बंड करतोच. रशिया ज्याने शक्तिमान केला तो जोसेफ स्टालिन. स्टालिनच्या मृत्यूपूर्वी काही दिवसच भारताचे हायकमिशनर श्री. के.पी.एस. मेनन यांना स्टालिनची भेट मिळाली होती. स्टालिन त्यांना म्हणाला, “आमचा शेतकरी साधा माणूस आहे. लांडगा अंगावर आला तर तो त्याला उपदेश करीत नाही, सरळ ठार करतो! लांडग्याला हे समजते व तोही त्यामुळे अंगावर येत नाही.” भारताच्या शेतकऱ्याने तेच केले आहे.

सत्ता सोडतील काय?

निवडणुका जवळ जवळ संपल्या आहेत व 4 जूननंतर काय? यावर चर्चा सुरू आहेत. मोदी व शहा यांचा पराभव झाला तरी ते सहज सत्ता सोडणार नाहीत. एखाद्या हुकूमशहाप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असे बोलले जाते ते खरे नाही. 4 जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल. लष्करप्रमुख, पोलीस, प्रशासन यांचे प्रमुख मोदी-शहांचे काहीएक ऐकणार नाहीत. या सर्व संस्था गुलामीच्या बेडय़ा तोडून टाकतील. “ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता. ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही व अमेरिकेच्या संसदेत त्यांचे भाडोत्री लोक घुसवून गोंधळ घातला. असा काही प्रकार मोदी-शहांचे लोक करतील काय? असे काहीच करण्याचे बळ त्यांच्याकडे राहणार नाही. या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागेल. कारण कोणताही अतिरेकी प्रयोग केल्यास शांत डोक्याने क्रांती करणारा मतदार खवळून रस्त्यावर येईल. ईडी, सीबीआय, इन्कम टाक्स, पोलीसप्रमुख दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांच्या दारात भेटीसाठी उभे राहिल्याचे चित्र दिसेल. त्यामुळे विरोधकांना धमकावण्याची ताकद त्यांच्यात राहणार नाही. सत्तांतर शांतपणे व सुरळीत पार पडेल. मोदी व शहांमध्ये लढण्याचे बळ व कौशल्य नाही व तपास यंत्रणांचे हत्यारच नसल्याने या दोघांनाही कदाचित काही काळासाठी अज्ञातवासातच जावे लागेल. नाहीतर लोकांचा रोष सहन करावा लागेल.

इंडियाबहुमताकडे

भाजप व त्यांचे मित्रपक्ष मिळून बहुमताच्या आसपास पोहोचत नाहीत व इंडिया आघाडीस तीनशेच्या जवळपास जागा मिळत आहेत. मोदींचे सरकार जात आहे. त्यामुळे परदेशी उद्योगपतींनी साधारण सवा लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतली. नव्या सरकारबरोबर नवा करार करू असे या सगळय़ांचे म्हणणे. मोदी यांच्या काळात नवी गुंतवणूक देशात आलीच नाही व देशाची संपत्ती घेऊन येथील धनिक बाहेर गेले. भारतातून सर्वाधिक संपत्ती दुबईत गेली. दुबईच्या रिअल इस्टेट उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक भारतीयांनी केली आहे. 29,700 भारतीयांनी मोदी काळात दुबईत संपत्ती खरेदी केली. दुबईतील 35000 महत्त्वाच्या प्रॉपर्टी भारतीयांच्या मालकीच्या आहेत व यात गुजराती व मारवाडी सर्वाधिक आहेत या संपत्तीची अंदाजे किंमत 17 अब्ज डालर इतकी आहे. हा सर्व काळा पैसा आहे व मोदी काळात हे काळे धन दुबईत गेले. दुबईचे शेख राजे मोदींचे मित्र आहेत. त्यांच्या मदतीने मोदी या सगळय़ांचे काळे धन भारतात आणू शकले असते. कारण ते विश्वगुरू, विष्णूचे तेरावे अवतार असे बरेच काही आहेत, पण मोदी व त्यांच्या लोकांनी उघडपणे देशाची लूट होऊ दिली व पुन्हा देशभक्त असल्याचा बिल्ला छातीवर लावून हे फिरत राहिले. मोदी व शहा हेच देशातील काळय़ा धनाचे मुख्य चौकीदार म्हणून वावरले. त्यांनी सर्व काळे धन भारतात परत आणण्याचे वचन दिले, ते खोटे ठरले.

मोदी यांनी त्यांच्या मित्रांची संपत्ती वाढवली. त्याच संपत्तीवर राजकारण केले. गरीबांना धर्माच्या अफूची गोळी दिली. गुलामांना गुंगीत ठेवून स्वत: मौजा करीत राहिले. ते विरोधकांवर खोटे आरोप करीत राहिले, ओरडत राहिले. हे सर्व खेळ 4 जूननंतर बंद होतील.

योगी जातील

4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.

जवानांचे आत्मे

महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले.

विचारांवर चालणारा महाराष्ट्र या निवडणुकीत पैशांच्या धुरळय़ावर चालला.

लोकांनी पैसे घेतले. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेलाही भ्रष्ट केले.

त्याचे आज कुणालाच काही वाटेनासे झाले. मोदी-शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राचे केलेले हे अध:पतन. तरीही महाराष्ट्र विकला जाणार नाही व किमान 32 जागांवर मोदी-शहा मित्रमंडळाचा पराभव होईल. महाविकास आघाडीने झंझावात उभा केला. त्यामुळे मोदी-फडणवीस-शिंदे उडून गेले. अमित शहांची दखलही महाराष्ट्राने घेतली नाही. महाराष्ट्रात पैशांचे राज्य या लोकांनी निर्माण केले. तोच महाराष्ट्र दिल्लीतील पैशांचे राज्य उखडून फेकेल. बदल नक्की होतोय. मोदींच्या बोलण्यातला व अंगातला जोर ओसरलाय हे दिसत आहे. 2019 ची निवडणूक ‘पुलवामा’ हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली.

2024 ची निवडणूक मोदी-शहा त्याच जवानांचे शाप-तळतळाट यामुळे हरत आहेत. जवानांचे आत्मे भटकतच होते. 4 जूनला त्यांना मोक्षप्राप्ती होईल.

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]