रोखठोक – गांधी! गांधी! गांधी! जी रामजी!

‘मनरेगाम्हणजे महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार गॅरंटी योजना. गांधींच्या ग्राम स्वराज योजनेचे हे प्रतीक. मोदी यांना सणक आली त्यांनी मनरेगातून गांधी काढून श्रीराम टाकले. ‘गांधी नावाची भीती मोदींची झोप उडवत आहे. जग ज्यांना पुजत आहे त्यांचे नाव आम्ही पुसत आहोत, पण गांधींचे विस्मरण जगाला कधीच होणार नाही.

 

ज्याने राष्ट्राच्या सेवेसाठी आपले शरीर झिजवले त्याला मरणानंतरही कोणी विसरत नाही.”

गांधी (8-8-1920)

गांधींनी राष्ट्राच्या सेवेसाठी आपले शरीर झिजवले व राष्ट्राच्या सेवेसाठीच बलिदान दिले. त्यामुळे संपूर्ण जगाने मरणानंतरही त्यांचे स्मरण ठेवले, पण भारताच्या सध्याच्या राज्यकर्त्यांना गांधी मान्य नाहीत. मोदी काळात प्रत्येक ठिकाणी गांधींच्या नावावर फुल्या मारण्याचा उपक्रम सुरू आहे. ही सत्तेची मस्ती आहे. ज्यांच्यापुढे जग नतमस्तक आहे अशा गांधींचा तिरस्कार करणे व त्यांचे अस्तित्व नष्ट करणे यातच मोदी स्वतःला धन्य समजत आहेत. मोदी सरकारने आता गांधींच्या बाबतीत नवा पराक्रम केला. ‘मनरेगा’ या मोठ्या योजनेच्या नावातून महात्मा गांधींचे नाव वगळून योजनेस नवीन नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने आणला तो गांधी द्वेषातून. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता ‘जी रामजी’ या नावाने रंगरूप बदलून समोर आणली जाईल. ‘मनरेगा’ म्हणजे ‘जी रामजी’ योजना. अयोध्येत इतके भव्य राममंदिर उभारूनही भाजपला अद्याप रामनामाचा सहारा लागतो हे आश्चर्यकारक आहे. रामाचे नाव देण्याआधी ‘पूज्य बापू योजना’ असे नाव देण्याचा घाट घातला. ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मागे पडला. कारण गुजरातमध्ये ‘आसाराम बापू’पासून सर्वत्र ‘बापूं’चे अमाप पीक आहे. बापू योजनेचे नाव मोदींचे एकेकाळचे गुरू महाराज ‘आसाराम बापू’शी जोडल्याने ‘जी रामजी’वर शिक्कामोर्तब झाले. बापू आणि रामाच्या प्रेमाचा विषय नाही, तर ‘गांधी’ नावाची भीती यात जास्त दिसते. ही भीती फक्त महात्मा गांधींची नाही, तर सोनिया, राहुल आणि प्रियंका या गांधींचीदेखील आहे. गांधींच्या नुसत्या नावाने मोदी-शहांची झोप उडते. ‘मनरेगा’तून गांधींचे नाव काढणे हा त्याच ‘गांधीं’च्या नावाने होणारा थरकाप आहे. गांधींचा संबंध ग्राम स्वराज योजनेशी आहे. त्यामुळे ‘मनरेगा’स गांधींचे नाव दिले. भाजप किंवा संघ परिवार नेहरू, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे निर्माण करू शकले नाहीत. याच न्यूनगंडाने पछाडलेल्या लोकांनी महात्मा गांधी, पंडित नेहरूंची नावे पुसण्याचा उपक्रम सुरू केला. संपूर्ण देशाने धिक्कार करावा असा हा प्रकार आहे. प्रभू श्रीराम हयात असते तर त्यांनीही या पापाबद्दल मोदींना आजन्म वनवासात पाठवले असते.

महाराष्ट्राची योजना

रोजगार हमी योजना या महाराष्ट्रात सुरू झालेल्या योजनेने राष्ट्रीय स्वरूप धारण केले. महात्मा गांधींच्या नावाने ही योजना 2005 साली देशात लागू झाली. या योजनेला ‘काँग्रेसची यशस्वी योजना’ अशी कीर्ती लाभली, पण या योजनेचे नाव बदलून स्वतः श्रेय घ्यावे असा विचार कोणत्याच बिगर काँग्रेसी सरकारने केला नाही. ‘किमान शंभर दिवस रोजगाराची गॅरंटी’ असे या योजनेचे स्वरूप. सध्या तब्बल साडेआठ कोटी लोकांना या योजनेतून रोजगार मिळतो. ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम देण्यासाठी ही योजना आणली व ती यशस्वीपणे चालवली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या योजनेवर टीका केली, पण ते केंद्रात सत्तेत येताच हीच योजना ग्रामीण रोजगाराचा आधार  ठरली. आता मोदी या ‘काँग्रेसी’ योजनेच्या इतक्या प्रेमात पडले की, त्यांनी योजनेचे नाव बदलून ‘जी रामजी’ योजना असे केले. हा उपद्व्याप कशासाठी? मोदी व त्यांच्या लोकांना ‘गांधी’ नकोत. महात्मा गांधींनी पारतंत्र्यात इंग्रजांना सळो की पळो केले व आता संसदेतले ‘गांधी’ मोदी सरकार व त्यांच्या लोकांचे बुरखे रोज फाडत आहेत. त्याचा बदला त्यांनी महात्मा गांधींवर घेतला. गांधींचे नाव ‘मनरेगा’तून काढून त्यांनी सुखाची झोप घेतली. आता त्यांनी ‘पूज्य बापू’ असे नामकरण केले. गुजरातमध्ये गल्लोगल्लीत बापू आहेत. एखाद्या गल्लीत ‘बापू’ अशी हाळी दिली की, शंभरेक बापू बाहेर येतील. पुन्हा मोदींचे एकेकाळचे ‘गुरू’ आसाराम बापू वगैरे आहेतच. शंकरसिंह वाघेला यांच्यासारख्या नेत्यांनाही ‘बापू’ म्हणूनच संबोधले जाते. काय सांगावे? ‘नमो’ नामातली जादू संपल्याने अंधभक्त उद्या मोदींनाही ‘बापू’ म्हणून संबोधतील. त्याच बापूसाठी देशातील सगळ्यात मोठ्या योजनेचे नामांतर झाले काय? पण ‘बापू’ मागे पडले व गांधींची जागा ‘रामजीं’नी घेतली.

गांधी सर्वत्र

मोदी हे स्वयंघोषित विश्वगुरू आहेत, पण त्यांना तो मान व प्रतिष्ठा जगाने कधीच दिली नाही. जगातील 90 देशांत गांधींचे पुतळे उभारले आहेत व तितक्याच देशांत गांधींच्या स्मरणार्थ रस्ते आणि चौकांना नावे दिली. जगभरातील विद्यापीठांत ‘गांधी’ जिवंत आहेत. त्यामुळे भारतात गांधी मारले तरी ते जिवंतच राहतील. जगभरातील राष्ट्रप्रमुख दिल्लीत येतात तेव्हा ‘राजघाटावर’ जाऊन गांधी समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा भारत दौरा पूर्ण होत नाही. गांधी हे सच्चे देशभक्त होते. गांधीजी म्हणत, “देशभक्ती म्हणजे सर्व लोकांचे आणि समाजाचे कल्याण. सत्ता संपादन करणे म्हणजे देशभक्ती किंवा स्वातंत्र्य असा अर्थ नसून लाखो लोकांना स्वयंशासनाचा अधिकार मिळवून देण्यासाठी धडपड करणे ही खरी देशभक्ती आहे.” मोदी व त्यांच्या लोकांना गांधींची देशभक्तीची ही व्याख्या मान्य होणार नाही. गांधी म्हणत, “सार्वजनिक कार्यकर्त्याने स्वतःसाठी देणग्यांचा कधीही स्वीकार करू नये, असे माझे ठाम मत अनुभवाने पक्के बनले आहे.” मोदी काळात भाजपच्या तिजोरीत दहा हजार कोटी जमा झाले व पी. एम. केअर फंडात किती कोटींच्या देणग्या आल्या त्याची मोजदाद नाही. पी. एम. केअर फंड हा मोदींचा खासगी फंड आहे. महात्मा गांधींनी देशसेवेसाठी जीवन वाहून घेणारे अनेक नेते निर्माण केले. आज फक्त दलालांची व ठेकेदारांची पैदास सुरू आहे.

नावे बदला योजना

पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारने ‘महात्मा गांधी रोजगार हमी’चे नाव ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ असे केले. वर्षाला दोन कोटी रोजगार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी यांची योजना होती. ती अपयशी ठरली. तेव्हा काँग्रेसच्या ‘मनरेगा’ योजनेवर डल्ला मारून त्या योजनेचे नामांतर केले. काँग्रेस काळातील अशा अनेक योजनांची नावे बदलून मोदी स्वतःला ‘विकास पुरुष’ म्हणून सिद्ध करीत आहेत. मोदींनी कशी नावे बदलली त्याची यादीच पहा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना

– ‘जी रामजी ग्रामीण रोजगार योजना

बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंट

जन धन खाते

निर्मल भारत अभियान

स्वच्छ भारत मिशन

राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (NULM)

दीनदयाल अंत्योदय योजना

नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी

मेक इन इंडिया

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना

स्वावलंबन योजना

अटल पेन्शन योजना

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम

स्किल इंडिया

गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

राष्ट्रीय कृषी बीमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना

राजीव आवास योजना

सरदार पटेल नॅशनल मिशन फॉर अर्बन हौसिंग

नॅशनल गर्ल चाइल्ड डे प्रोग्राम

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना

जन औषधी योजना

प्रधानमंत्री जन औषधी योजना

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना

दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना

नॅशनल मेरीटाइम डेव्हलपमेंट प्रोग्राम

सागरमाला

नॅशनल सरल लिव्हलीहूड मिशन (आजीविका)

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण योजना

त्वरित सिंचाई लाभ कार्यक्रम

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

न्यू डील फॉर रुरल इंडिया

ग्राम उदय से भारत उदय

भारत का सार्वभौमिक टीकाकरण कार्यक्रम (UIP)

मिशन इंद्रधनुष

इंदिरा आवास योजना

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना

एकीकृत बाल विकास सेवा योजना (ICDS)

राष्ट्रीय पोषण अभियान

मोदी अयोध्येतील राममंदिराचे श्रेय स्वतः घेतात व रामच निवडणुका जिंकून देईल असे त्यांना वाटते. त्यामुळे धर्माच्या नावाची नवी भांग ग्रामीण रोजगार योजनेतील गरीबांना देण्याचा हा प्रकार आहे. स्वतः काही निर्माण करण्याची कुवत आणि क्षमता नाही. त्यामुळे नेहरू-गांधींनी जे निर्माण केले ते उद्योगपती मित्रांना विकायचे किंवा नष्ट करायचे. काँग्रेस काळातील सर्व योजनांची नावे बदलून स्वतःची नावे देणे एवढ्यापुरताच यांचा विकास दिसतो. ‘जी रामजी’च्या नावाने शेवटी इतकेच सांगतो, “मोदी यांचे नाव राष्ट्र निर्माण करणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल. अयोध्येत राममंदिर उभे केले, पण त्याच्या कित्येक दशके आधी गांधींनी देशभरात श्रीरामाची मंदिरे उभी केली, पण त्याचे राजकारण केले नाही. राममंदिर हा कष्टकऱ्यांचा विसावा होता. आज श्रीरामांना द्वेष, तिरस्कार व धर्मांधतेचे प्रतीक बनवून मोदी व त्यांच्या लोकांनी हिंदुत्वाचे प्रचंड नुकसान केले आहे!”

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]