रोखठोक – सजन रे झूठ मत बोलो…

नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री `खतरनाक’ पद्धतीने खोटे बोलतात. उद्धव ठाकरे यांच्यावरील त्यांचे आरोप व चिखलफेक यामुळे शिंदे यांचाच खरा चेहरा उघडा होतोय. जसे पंतप्रधान तसे त्यांचे चेले, पण महाराष्ट्राची ही परंपरा नाही.

पंतप्रधान मोदी अचानक अयोध्येत पोहोचले व अयोध्येच्या रस्त्यावर त्यांनी रोड शो केला. रामाच्या नावावर मते मागण्याची ही धडपड केविलवाणी आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी देश जात असताना कार्यवाहक पंतप्रधान मोदी हे रामाच्या मंदिरात जातात. मूर्तीसमोर ध्यानस्थ उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात, हा सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने तरी असे वागू नये. अयोध्येतील राममंदिराचे आपण मालक आहोत व त्यामुळे देशातील हिंदूंनी मते द्यावीत, असे मोदी व त्यांच्या लोकांना वाटते, पण इतके करूनही या वेळी खुद्द उत्तर प्रदेशातही राम लहर उठलेली नाही व उत्तरेत भाजपचा खेळ 45 ते 50 जागांतच आटोपत आहे. हे वास्तव मोदी-शहांच्या हृदयाचे ठोके वाढविणारे आहे.

रामाचे नाव, पैशांचा वापर, पोलीस, ईडीची दहशत, ढोंगबाजी याला न जुमानता लोक सर्वत्र मतदानास उतरत आहेत. मोदी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या काळात देशाला काय दिले? याचे उत्तर एकाच वाक्यात द्यायचे तर, बापाला बाप मानू नका. आईला आई म्हणू नका. स्वार्थ महत्त्वाचा, हा नवा आदर्श मोदी यांनी दिला व असे वर्तन करणारे लोक जागोजाग निर्माण केले. बारामती लोकसभा मतदारसंघात या वेळी हे चित्र प्रामुख्याने दिसले. मतदान सुरू असताना इंदापूरचे आमदार दत्ता भारणे हे मतदान केंद्राबाहेर उभे राहून लोकांना धमक्या देत होते. `सुप्रिया सुळे यांना मतदान कराल तर याद राखा. तुम्हाला बारामतीमधून वाचवायला कोणी येणार नाही. गाठ माझ्याशी आहे,’ अशी भाषा ते वापरत राहिले. आपल्या पत्नीला मते दिली नाहीत तर पाणी बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी इंदापूरच्या मतदारांना दिली.

दत्ता भारणे हे शरद पवारांना सोडून अजित पवारांना सामील झाले व त्यांनी आपल्याच बापाविरुद्ध आव्हानांची भाषा केली. मोदी-शहांनी गेल्या दहा वर्षांत पेरलेल्या या विषाला उकळी फुटली आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा व संस्कार त्यामुळे नष्ट झाला.

डोक्यावर परिणाम?

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झाला आहे. मोदी-शहांची सत्ता कोसळेल तेव्हा अशा लोकांचे जगणे व रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल. मोदी-शहा हे काही अमरपट्टा बांधून या भूतलावर अवतरलेले नाहीत. शिंदे हे वारंवार एका गोष्टीचा धोशा लावत आहेत. देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांना तुरंगात टाकायचे, भाजपमधील आमदारांना घाबरवून त्यातील 20 ते 25 आमदार फोडायचे आणि सरकार मजबूत करायचे असा कट उद्धव ठाकरे रचीत होते, असे मुख्यमंत्री शिंदे अलीकडे वारंवार बोलत आहेत. शिंदे यांची ही विधाने टुकार व त्यांच्या सध्याच्या मालकांना खूश करण्यासाठी आहेत. भाजपचे लोक बेकायदेशीरपणे आज कुणालाही अटक करतात. केजरीवाल, सोरेन यांच्यासारख्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना प्रचारात सहभागी होता येऊ नये म्हणून अटक करतात. ही विकृती भाजपची आहे. मुळात मोदी-फडणवीस-शहा हे `त्रिकूट’ एकनाथ शिंदे, अजित पवार व त्यांच्याबरोबरच्या सात-आठ लोकांना अटक करणार होते. या `कटा’चा सुगावा लागताच नेसत्या वस्त्रानिशी शिंदे व त्यांचे लोक भाजपात पळून गेले. महाराष्ट्रात आजही पळपुटय़ांची जमात आहे हे शिंदे यांनी दाखवून दिले. आता फडणवीस वगैरे लोकांना तुरंगात डांबण्याचा कट होता याबाबत शिंदे यांनी स्फोट केला. फडणवीस, महाजन वगैरे लोकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप होते व त्या सर्व फायली सध्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी पाहाव्यात व जनतेच्या माहितीसाठी खुल्या कराव्यात. गृहमंत्री म्हणून फडणवीस आपल्या विरोधकांचे फोन चोरून ऐकत होते. विरोधकांवर पाळत ठेवत होते व त्यासाठी महासंचालक दर्जाचा अधिकारी खास नेमला होता. त्या अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला व हे प्रकरण फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले होते. याच भयातून भाजपने शिंदे वगैरे लोकांना ब्लाकमेल करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले व नवे सरकार येताच रश्मी शुक्ला यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेऊन फडणवीसांनी स्वत:ची सुटका करून घेतली. हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर व दहशतवाद आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशी करायला काहीच हरकत नव्हती. स्वत:ची कातडी व तुरंगवारी वाचविण्यासाठीच शिंदे-फडणवीस संगनमत झाले व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे आज खोटे बोलत आहेत. हा मोदी-फडणवीस सहवासाचा परिणाम.

पक्ष सोडण्याचे प्रयत्न

एकनाथ शिंदे यांनी पाच वर्षांत तीन वेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरण्याचीही त्यांची योजना होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अहमद पटेल यांच्याशी संधान बांधून ते काँग्रेसमध्ये निघालेच होते, पण शेवटी मोदी-शहांनी त्यांच्यातले हे कसब हेरले व त्यांच्या खेळास उत्तेजन दिले. हा खेळ लवकरच संपेल. शिंदे यांच्या तोंडास भाजपचा भोंगा आहे व त्या भोंग्यातून रोज नवे आरोप ते उद्धव ठाकरेंवर करीत आहेत. शिंदे यांचा नवा आरोप त्यांचे मानसिक स्वास्थ्य ढासळल्याचा पुरावा आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या संपत्तीवर म्हणे उद्धव ठाकरे यांचा डोळा होता. दिघे यांच्या निधनानंतर त्यांची कुठे मालमत्ता आहे? असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला होता,असे म्हणणे हास्यास्पद आहे. मुळात दिघे ज्या टेंभी नाक्यावरील आश्रमवजा वास्तूत राहात होते ती वास्तू हीच त्यांची संपत्ती होती व या वास्तूवर शिंदे यांनी बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. स्वत: शिंदे यांच्या इस्टेटीची व्याप्ती अमर्याद आहे व पैसा हेच त्यांचे मुख्य हत्यार आहे. ही सर्व संपत्ती कशी जमा झाली? दिघे यांच्या नावाचा व्यापार हे लोक गेल्या दोन वर्षांपासून करू लागले. आनंद दिघे यांच्या आत्म्यासही त्यामुळे त्रास होत असेल. श्री. शिंदे हे दुसऱ्यांच्या `इस्टेटी’चे हिशेब मंत्रालयात बसून करतात, पण 30-35 वर्षांपूर्वीचा ठाण्यातील एक साधा रिक्षावाला आज गडगंज संपत्तीचा मालक कसा झाला? त्याच पैशावर तो आमदार-खासदार विकत घेऊन राज्याचा मुख्यमंत्री होतो व दिल्लीच्या नव्या बापाच्या चरणी थैल्यांचे ढिगारे रचतो. हे वैभव त्याला आनंद दिघेंमुळे प्राप्त झाले की शिवसेना, ठाकरे कुटुंबामुळे? याचा खुलासा एकदा व्हायलाच हवा. दिघे हे मोदींप्रमाणे ढोंगी फकीर नव्हते. ते खरे फकीर होते. त्या फकिराच्या नावावर ठाण्यात अनेकांनी अर्थकारण केले. त्यातून रिक्षाच्या जागी मर्सिडीजचे ताफे, बंगले, इस्टेटी उभ्या राहिल्या.

शिंदे आज दुसऱ्याच्या घरावर दगड मारत आहेत.

त्यांच्या काचेच्या घराचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे!

तो दिवस लांब नाही!

शिंदे यांचे सध्याचे बोलणे ऐकून मला ‘तिसरी कसम’ चित्रपटातील एक गीत आठवते. मुकेश त्याच्या दर्दभऱ्या स्वरात सांगतो…

`सजन रे झूठ मत बोलो

खुदा के पास जाना है…’

शिंदे यांनी हे विसरू नये. खरे बोलायलाही मर्दाची छाती लागते. ती त्यांच्याकडे आहे काय?

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]