रोखठोक – एका अंधाऱ्या रात्री! प्रियंका गांधींची लढाई

rokhthok

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. तो मंत्रीपुत्र आजही मोकाट आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व या निमित्ताने पुन्हा दिसले!

आपल्या देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्या घरात पोहोचली आहे. लोक रोज जन्माला येतात आणि किड्यामुंग्यांसारखे मरतात. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात भाजपच्या मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले याचे विरोधकांनी इतके भांडवल का करावे? असा प्रश्न जगाला पडला आहे. देशाचे राजकारण चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येमुळे ढवळून निघाले आहे. लखीमपूर खेरीत शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. याच भागातले खासदार व केंद्रात गृहराज्यमंत्री असलेले अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष व त्यांचे मित्र जीप गाडीतून एका कार्यक्रमासाठी निघाले होते. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून त्यांचा पारा चढला व या महाशयांनी सरळ भरधाव गाडी त्या शेतकऱ्यांवर घातली. शेतकऱ्यांना चिरडून गाडी पुढे गेली, पण चाकाखाली एक शेतकरी अडकल्याने गाडी थांबली. तेव्हा हे सर्व मस्तवाल लोक पळून गेले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी गाडीचा ड्रायव्हर व इतरांना मरेपर्यंत मारले हे सत्य आहेच. हे सर्व प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या अंगलट आले आहे. चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण आहेच, पण त्याच रात्री लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधी यांच्या नातीला, राजीव गांधी यांच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना त्या दिवशी देशाने पाहिले. ‘मला का अडवताय? कोणत्या कलमाखाली अटक करताय?’ या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती! त्यामुळे प्रियंकांची अटक बेकायदेशीरच ठरते!

प्रियंकांना अटक

प्रियंका गांधींच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला. 4 ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला त्यांना इंदिरा गांधींचे अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. रात्रीचा गडद अंधार, त्यात एखाद्या वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा. प्रियंकांची गाडी आधी रोखली. त्यांना गाडीतून उतरवले. पुढे जाऊ नये असे बजावले. त्यांनी नकार दिला. कोणत्या कायद्याने मला अडवताय हा त्यांचा प्रश्न. आपण पोलिसांच्या गाडीत बसा असे सांगताच ‘वॉरंट असेल तर दाखवा. मी अशा पद्धतीने बेकायदेशीररीत्या तुमच्यासोबत येणार नाही.’ हे त्यांनी योगींच्या पोलिसांना ठणकावले. त्या काळोखात इंदिरा नावाची वीज पुन्हा कडाडली आहे असाच भास देशाला झाला. प्रियंका यांना सीतापूरला जबरदस्तीने नेले व डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियंका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियंका यांच्या एका झाडूने मात केली. नेते जेव्हा साहस दाखवतात तेव्हा कार्यकर्त्यांत विश्वासाची मशाल पेटते. सीतापूरला शेवटी तेच झाले.

हम नही डरेंगे!

मंगळवारी दुपारी मी दिल्लीत श्री. राहुल गांधी यांना भेटलो. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. श्री. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात श्री. गांधी यांनी केली. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचे पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. श्री. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा. “पंजाबचा तिढा सुटला काय?’’ मी.
“नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.’’ – गांधी.
“सिद्धूचे काय करणार?’’ मी.
“तेसुद्धा शांत होतील.’’ श्री. गांधी.
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत श्री. गांधींनी बोलून दाखवली. ती खरीच आहे. तृणमूल व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते. ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारार्हता नाही व श्री. केजरीवाल हे पेंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे. हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही. या सगळ्यांना श्री. राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. श्री. मोदी व शहांचेही तेच मत आहे. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे. प्रियंका गांधी लखीमपूर खेरीत जाताना त्यांना अडवले व तुरुंगात टाकले. दुसऱ्या दिवशी असंख्य लोक हाती मशाली घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा सीतापूरला काँग्रेसकडे इतके कार्यकर्ते आले कुठून, हा प्रश्न अनेकांना पडला. गांधी घराण्याचे वलय आजही आहे. काँग्रेसला सहज संपवता येणार नाही, हे प्रियंकांच्या अटकेने पुन्हा स्पष्ट झाले.

इंदिरा गांधीच अवतरल्या…

श्री. राहुल व प्रियंका गांधी अखेर लखीमपूर खेरीला पोहोचले व त्यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यासाठी सरकारशी संघर्ष करावा लागला. इंदिरा गांधी हे सर्व करत होत्या. त्याचीच झलक प्रियंका गांधींच्या संघर्षात पाहता आली. 44 वर्षांपूर्वी अशाच एका 3 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांना अटक करण्यात आली होती (1977). पोलीस इंदिराजींना दिल्लीहून अटक करून हरयाणात घेऊन जात होते. इंदिरा गांधींनी विरोध केला. झटापट झाली. रस्त्यात बडखल रेल्वे क्रॉसिंगजवळ फाटक बंद होते. पोलिसांच्या ताफ्यास तेथे थांबावे लागले. इंदिरा गांधी यांनी जीपमधून उडी मारली व रस्त्याजवळ अर्थवट बांधकाम अवस्थेतील एका पुलावर बसकण मांडली. पुढे जाण्यास त्यांनी नकार दिला. एकच गोंधळ सुरू झाला. त्या वेळी संपर्काची साधने तशी नव्हतीच. मोबाईल फोन सोडाच, साधे फोनही फार नव्हते, पण इंदिरा गांधींच्या अटकेची बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली व हजारो काँग्रेस कार्यकर्ते त्या रेल्वे क्रॉसिंगवर ‘इंदिराजी आगे बढो’च्या घोषणा देत जमले. पोलीस व सरकार हतबल झाले. इंदिराजींच्या एका साहसी कृतीने कार्यकर्त्यांत जोश भरला. शेवटी पोलिसांना इंदिरा गांधींना घेऊन मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर करावे लागले व त्या बेकायदेशीर अटकेतून इंदिरा गांधींची सुटका झाली.

हाथरसपासून लखीमपूर खेरीपर्यंत राहुल व प्रियंका त्याच पद्धतीने वागल्या. प्रियंका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्या काळाची सुरुवात झाली आहे हे सीतापूरच्या रस्त्यावर प्रियंका यांनी दाखवले.
राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची शकले झालेली दिसत आहेत. आघाड्या होण्याआधीच अहंकाराच्या सुईने त्या फुटतात. प्रत्येकाला आपल्या राज्याचा सुभा सांभाळायचा आहे व सध्याच्या राजकीय परिस्थितीत दिल्लीचे मांडलिक बनून दिवस ढकलायचे आहेत. इंदिरा गांधी व त्यांची काँग्रेस नको म्हणून 1977 साली विरोधक एकत्र आले व सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते. आज सगळ्यांना एकत्र करणारे जयप्रकाश नारायण नाहीत व लढण्याची प्रेरणा देणारे जॉर्ज फर्नांडिसही नाहीत. सगळेच तडजोडवादी बनले आहेत. या पार्श्वभूमीवर लखीमपूर खेरीचे प्रकरण, त्यातून निर्माण झालेली प्रियंका नावाची ठिणगीही महत्त्वाची वाटते. लखीमपूर खेरीत भरधाव गाडी चालवून शेतकऱ्यांना चिरडणारा मंत्रीपुत्र आशिष मिश्रा अद्याप मोकळाच आहे!

ईडी, सीबीआय, एनसीबीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा कोणावरही धाडी घालतात व कोणालाही अटक करतात. त्याच राज्यात चार शेतकऱ्यांना चिरडणारा मंत्रीपुत्र मोकाट फिरतो.
त्याच्या अटकेसाठी प्रियंका गांधींनी स्वतःला अटक करून घेतली!
लढाई यालाच म्हणतात.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या