रोखठोक : अटलजी, तुम्ही अमर आहात!

249

rokhthokअटलबिहारी वाजपेयी यांना विसरता येणार नाही. त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व असामान्य होते. शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच ते मनमोकळे, दिलदार होते. ढोंग आणि लपवाछपवी नाही. त्यांचे स्मरण सदैव राहील.

अटलबिहारी वाजपेयींनी जगाचा निरोप घेतला हे मान्य करणे कठीण आहे. ते सदैव सदाबहार नेते होते व राहतील. त्यांचा फक्त श्वास थांबला आहे. देहाची राख झाली, ती देशाच्याच मातीत मिसळून गेली. त्यांच्या लाडक्या पंडित नेहरूंप्रमाणे. पण श्वास थांबला, देहाची राख झाली म्हणून कोणी मरत नाही. तसे असते तर राम, कृष्ण, शिवराय, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे अमर झाले नसते. वाजपेयी त्याच पंथातले आहेत. वाजपेयींना डिमेन्शिया नावाच्या आजाराने ग्रासले. हा आजार विचित्र आहे. यात व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. आपली ओळख, आपले अस्तित्वच तो हरवतो. अटलजींचे नेमके तसेच झाले, पण पुढील अनेक शतके देश अटलबिहारींना विसरू शकणार नाही. वाजपेयी नक्की काय होते? ते सहमती आणि ऐक्याचे प्रतीक होते. किमान पंधरा वर्षे ते देशातील सर्वच घडामोडींपासून दूर होते. राजकारणाशी त्यांचा संबंध उरला नाही. तरीही त्यांच्या रूपाने भारतीय राजकारणाचा पवित्र आत्मा जिवंत होता. हा आत्माही आपण हरवून बसलो आहोत.

‘मेरे प्रभू!
मुझे इतनी उंचाई कभी मत देना।
गैरों को गले न लगा सकू
इतनी रुसवाई कभी मत देना।।

आज संसदीय लोकशाहीचा स्तर साफ कोसळला आहे. संसदेतल्या चर्चा धुरळा व चिखलफेक झाली आहे. संसदेत फक्त लाठ्याकाठ्याच घेऊन बसायचे बाकी आहे. आता संसदेत कोणीही कोणाशीही कोणाबद्दलही काहीही बोलतोय. काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांचा उल्लेख ‘शूर्पणखा’ असा मोदी यांनी केला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. 1962 साली संसदेत काँग्रेस आणि विरोधकांत चकमक झाली. अटलजींच्या तोंडातून अचानक निघाले की, ‘काँग्रेसचे अर्धे सदस्य तर मूर्ख आहेत.’ यावर हंगामा सुरू झाला. सदनात वातावरण तापले. एक तास सभागृह बंद पडले. लोकसभा अध्यक्षांनी अटलजींना माफी मागण्यास सांगितले. अटलबिहारीच ते. त्यांनी त्यांच्या चिरपरिचित अंदाजात ‘खेद’ व्यक्त केला तो असा, ‘अभी एक घंटा पहले मैंने गलती से यह बोल दिया था की कांग्रेस के आधे सदस्य मूर्ख है, मैं अपने शब्द वापस लेता हूं. मैं ये कहना चाहता हूं, कांग्रेस के आधे सदस्य मूर्ख नहीं है।’ संपूर्ण सभागृहाने हास्यस्फोट केला.

मनमोकळे, दिलदार
अटलजी कसे होते? ते मनमोकळे होते. पंतप्रधान झाले, पण सरकार चालविण्याचा अनुभव नव्हता. सरकारात सर्व नव्या लोकांचा भरणा. एक दिवस अचानक काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना अटलजींचा फोन गेला. अटलजी म्हणाले, ‘आझाद साहब, तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले. तुमचा अनुभव मोठा आहे. तुम्ही आमच्या संसदीय कार्यमंत्र्यांना ट्रेनिंग द्या. आम्हाला सदन सहकार्याने चालवायचे आहे.’ हा विचार फक्त अटलबिहारीच करू शकतात. अटलबिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्य सैनिक होते की नाही त्यावर वाद निर्माण केले गेले, पण मिळालेल्या स्वातंत्र्यरक्षणासाठी झुंज देणारे ते महान योद्धे होते. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, पाकिस्तान ते श्रीलंका, चीन ते अमेरिका त्यांची विचारसरणी राष्ट्रीयच होती. जम्मू-कश्मीर आमच्या दृष्टीने जमिनीचा एक तुकडा नाही, तो एका आदर्शाचे, सिद्धांताचे प्रतीक आहे. वाजपेयी पुढे म्हणतात ते महत्त्वाचे. ते ठणकावून म्हणाले, ‘जेव्हा जम्मू-कश्मीर हा भारताचा अंगभूत भाग आहे हे सिद्ध झाले तेव्हा त्याच्या भवितव्याचा विचार केवळ जम्मू-कश्मीरची जनता करू शकत नाही, तर सर्व जनता करील. उद्या द्रविडस्थानचे समर्थक असे म्हणतील की, आम्ही भारतात राहू इच्छित नाही. आमचे जनमत घ्या. अशा राष्ट्रविरोधी मागण्या आपण मान्य करणार काय? आज मूठभर नागा हत्यारे घेऊन भारतीय सत्तेला आव्हान देत आहेत. आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही,’ असे ठणकावणारे वाजपेयी स्वातंत्र्यसेनानीच होते. परराष्ट्रमंत्री म्हणून व्हिएतनामला भेट देऊन आल्यावर वाजपेयींनी हो-चि-मिन्ह यांच्या गनिमी युद्धातील यशस्वी नेतृत्वाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. हो-चि-मिन्ह हे आधुनिक शिवाजी आहेत असे ते म्हणाले होते.

राजीनामा
वाजपेयी हे एक अजब रसायन होते. 13 दिवस, 13 महिने, 5 वर्षे अशी सरकारे त्यांनी चालवली. ‘माझ्याकडे बहुमत नाही, मी राजीनामा द्यायला निघालो आहे’ असे ते दोन्ही वेळा सांगत बाहेर गेले. शब्दांचा खेळ न करता ते राजीनामा देऊन आले. त्रिशंकू लोकसभेचे त्यांनी नेतृत्व केले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी लोकसभेतील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावले आणि त्या पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलमध्ये शपथविधी झाला. राष्ट्रपतींनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली, पण विश्वासदर्शक ठराव मताला टाकण्याऐवजी आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याकरिता राष्ट्रपती भवनात जात आहोत असे वाजपेयींनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला दोनशे दहा किंवा त्याच्या जवळपास जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही सरकार स्थापन करणार नाही अशी वाजपेयींची निवडणूकपूर्वीची घोषणा होती, पण प्रत्यक्षात भाजपला 161 जागा मिळाल्या. मित्रपक्षांचे मिळून 194 खासदार होते. त्यामुळे बहुमत सिद्ध करणे कठीण होते. 370 कलमासह अनेक विषय गुंडाळून ठेवण्याचा शब्द दिल्यावरही खासदारांची संख्या जमली नाही. बहुमत मिळवण्याकरिता आम्ही खासदारांची खरेदी करणार नाही, पण आम्ही Manipulation करणार आहोत. खासदारांची खरेदी आणि Manipulation यात फरक आहे असे त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत सांगितले. (टाइम्स ऑफ इंडिया 19 मे 1996). यावर पत्रकार जगन फडणीस यांनी म्हटले की, ‘मॅनिप्युलेशन’ या इंग्रजी शब्दाचा कृष्णाजी भास्कर वीरकर यांच्या इंग्लिश – मराठी डिक्शनरीत जो अर्थ दिला आहे तो असा – ‘हस्तकुशलता, लबाडी, हातचलाखी, खोटे तयार करणे!’ पण खासदारांची खरेदी वेगळी व मॅनिप्युलेशन यात फरक असल्याचे पंतप्रधान वाजपेयींनी देशाला विश्वासात घेऊन सांगितले. अर्थात ते मॅनिप्युलेशन त्यांच्या राजकीय व्यवस्थापकांना जमले नाही.

संघाने जुळवले
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वैयक्तिक सचिव म्हणूनही वाजपेयींनी काही काळ काम केले. 1957 मध्ये ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले आणि तेव्हापासूनच ते लोकांना सुपरिचित झाले. संसदेतील आणि सभांमधील त्यांची भाषणे गाजू लागली. हिंदी भाषेवरील प्रभुत्व, काव्यात्म शैली आणि अभिनयाची नैसर्गिक देणगी या बळावर वाजपेयी श्रोत्यांना मुग्ध करत.

जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांचा 1968 च्या फेब्रुवारीमध्ये खून झाल्यानंतर नव्या अध्यक्षासाठी शोध सुरू झाला. कुशल संघटक म्हणून नावलौकिक संपादन केलेले नानाजी देशमुख म्हणाले, ‘जो लोकांना आकृष्ट करू शकेल अशा माणसाला आपण अध्यक्ष केले पाहिजे.’ अटलबिहारी वाजपेयींशिवाय दुसऱया कोणाचेच नाव पुढे आले नाही. त्यावेळी वाजपेयींचे वय अवघे बेचाळीस वर्षांचे होते आणि तरीही नेतृत्वगुणांमध्ये त्यांच्याशी बरोबरी करू शकेल असा दुसरा कोणताही माणूस पक्षाला आढळला नाही.

आपण अध्यक्षपद स्वीकारावे अशी जेव्हा वाजपेयींना विनंती करण्यात आली तेव्हा दीनदयाळ उपाध्याय यांच्या आठवणीने त्यांच्या डोळय़ांत अश्रू उभे राहिले. ते म्हणाले, ‘मी दीनदयाळजींची जागा घ्यावी असं तुम्हाला वाटतं? माझी ती पात्रता नाही.’ परंतु इतरांनी आग्रह केल्यानंतर वाजपेयींनी अध्यक्षपद स्वीकारले आणि ती जबाबदारी अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली.

पण वाजपेयींची अडचण वेगळीच होती. ते संघ प्रवासी होते, पण संघाची करडी शिस्त वाजपेयींसारख्या खिलाडू स्वभावाच्या नेत्याला मानवणे शक्य नव्हते. त्यांचा कोंडमारा होऊ लागला. मग मात्र त्यांनी बंधने झुगारली व पंख लावून स्वच्छंद झेप घेतली. त्यांनी संघाशी जुळवून घेतले नाही, तर संघाने वाजपेयींशी नेहमीच जुळवून घेतले हे सत्य आहे.

सिन्हांची उचलबांगडी
वाजपेयी हे देशातील मध्यमवर्गीय गोरगरीबांचे मसिहा होते. त्यांची वाणी अमोघ होती. ते सर्वव्यापी, सर्वमान्य होते. यशवंत सिन्हांनी ‘भाजपची व्होट बँक’ म्हणून ओळखल्या जाणाऱया मध्यमवर्गाच्या खिशाला कात्री लावणारा अर्थसंकल्प कॅबिनेटच्या मंजुरीनंतर सादर केला, पण लोकांत असंतोष दिसताच वाजपेयींनी सिन्हा यांना अर्थमंत्री पदावरून हटवले. अर्थात कश्मीर प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. मुशर्रफ कश्मीरसाठी आग्र्यास पोहोचले, पण परिणाम शून्य. अटलजींनी पोखरणला अणुस्फोट केले. तेथेही परिणाम शून्य. मात्र अटलजी नसते तर डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले नसते. ‘भारत जमीन का टुकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है।’ अशा रोमांचक कविता त्यांनी रचल्या. ते कवी होते.

अग्निपरीक्षेच्या
या घडीला
या, अर्जुनाप्रमाणे
उद्घोष करूया
‘न दैन्यं, न पलायनम्।’

वाजपेयींचा स्वभाव असाच होता. ते राजकारणी होते, पण राष्ट्रहितास तागडीत ठेवून त्यांनी तडजोडीचे राजकारण केले नाही. गुजरात दंगलीनंतर त्यांनी त्यावेळी त्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना सुनावले, ‘राजधर्माचे पालन करा!’ पण नंतर वाजपेयींचा आवाज क्षीण होत गेला. तो मंदावत गेला. त्यांचा फक्त श्वास सुरू राहिला. त्यांची स्मृती गेली. आता श्वासही थांबला. पंडित नेहरूंप्रमाणेच वाजपेयीही कायम स्मरणात राहतील.

ट्वीटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या