
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक संस्थांचे स्वातंत्र्य मारले जात आहे! संसद, न्यायालये, वृत्तपत्रांना आज मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. राजकीय विरोधकांना संसदेत बोलू दिले जात नाही व त्यांना रोखण्यासाठी संसदेत ‘मार्शल’ची फौज उभी केली जाते. स्वातंत्र्य ते हेच काय?
दिल्लीत लोकशाहीचा मुडदा पडला असे चित्र गेल्या काही दिवसांत दिसले. संसदेचे पावसाळी अधिवेशन 15 दिवसांत चार तासही धड चालू शकले नाही. प्रचंड बहुमताने लोकशाही कशी कमजोर होते व त्या बहुमताच्या घोडय़ावर बेफाम प्रवृत्तीचे लोक स्वार झाले की काय घडते, याचा अनुभव सध्या देशाची राजधानी घेत आहे. लोकशाहीचा सुवर्णकाळ संपला आहे व सर्वकाही अधोगतीस लागले आहे. लोकशाही ‘मार्शल लॉ’च्या बुटाखाली चिरडताना ज्यांनी त्या दिवशी संसदेत पाहिले त्या सगळय़ांनी लोकशाहीला श्रद्धांजली वाहून संसदेतून काढता पाय घेतला.
दि. 10-08-2021 (मंगळवार)
विरोधी पक्षाने तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. दहा दिवसांपासून कृषी कायद्यांवर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी होती. पण मंगळवारी (10-8) राज्यसभा चेअरमनने अचानक लक्षवेधीचे रूपांतर अल्पकालीन चर्चेत करून ‘शेतकऱयांचे प्रश्न व सोडवणूक’ असे विषयांतर केले. ‘पेगॅसस’ हेरगिरीप्रकरणी चर्चेची मागणी कायम असताना ती टाळून यावर चर्चा ठेवून विरोधकांना उघडे पाडण्याचा प्रयत्न सरकार करू लागले तेव्हा चेअरमनसमोरच्या जागेत समस्त विरोधी पक्ष एकजुटीने उभा राहिला. काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा व ‘आप’चे संजय सिंह ‘वेल’मधील सेक्रेटरी जनरलच्या टेबलावर चढले. प्रचंड युद्धाचे चित्र उभे राहिले. दंगलप्रसंगी सैन्य पाचारण करावे तसे अध्यक्षांनी ‘बॉडीगार्ड’ची म्हणजे मार्शलची फौजच सभागृहात बोलावून काम चालवले. विरोधकांचे म्हणणे ऐकणार नाही, पण ‘मार्शल’ची भिंत उभी करून कामकाज चालवू! हेच त्यांचे धोरण होते.
11-8-2021 (बुधवार)
‘ओबीसी’ आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकांवर चर्चा करून ते मंजूर करण्याबाबत विरोधक व सत्ताधाऱयांत एकमत झाले. महाराष्ट्रातील मराठा आरक्षण व इतर राज्यांतील ‘मागास’ जातींसाठी हे विधेयक महत्त्वाचे असल्याने त्या कामात गोंधळ घालायचा नाही, पेगॅससपासून इतर सर्व मुद्दे बाजूला ठेवायचे ठरले. जनरल इन्शुरन्सच्या खासगीकरणास प्रचंड विरोध असल्याने त्यासंदर्भाच्या बिलावर दुसऱया दिवशी चर्चा करण्याचे ठरले, पण ‘ओबीसी’ विधेयक एकमताने मंजूर झाल्यावर सरकारने उशिरा विमा कंपन्यांच्या खासगीकरणाचे बिल मंजुरीसाठी आणले, तेव्हा भडका उडाला. सरकारने ही फसवणूक केली. विरोधी पक्षांतील मल्लिकार्जुन खरगे, श्री. शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी जागेवर उभे राहून विरोध केला. तरी राज्यसभेचे नेते पीयूष गोयल यांनी विमा कंपन्यांचे खासगीकरणाचे बिल आताच मंजूर करण्याचा रेटा लावला. तेव्हा कामगारांचे पुढारी असलेले अनेक खासदार सभापतींच्या आसनासमोर उभे राहिले. गोंधळ वाढला, तेव्हा संसदेच्या सभागृहात पुन्हा ‘बॉडीगार्ड’ म्हणजे मार्शल आणले गेले. त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली. हिंदुस्थान-पाक सीमेवर सैन्य उभे असते तसे सभापती व खासदारांमध्ये मार्शल उभे राहिले. जणू खासदारांवर वचक ठेवण्यासाठी कुणी बाहेरचे भाडोत्री लोक आणून उभे केले. ‘गेल्या 55 वर्षांत मी असे दृश्य पाहिले नव्हते,’ असे हताश उद्गार श्री. शरद पवार यांनी काढले.
जग काय म्हणत होते?
लोकशाहीच्या संपलेल्या सुवर्णकाळाचे दृश्य सध्या दिल्लीत दिसले. हिंदुस्थान ही जगातील सर्वात मोठी व 75 वर्षे टिकलेली लोकशाही आहे. सन 2000 साली अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत सणसणीत पेचप्रसंग निर्माण झाला होता. मतमोजणीपासून घटनात्मक पेचप्रसंगापर्यंत न्यायालयाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावर टिप्पणी करताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या वर्तमानपत्रात म्हटले होते की, ‘अमेरिकेला हिंदुस्थानकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.’ मागच्या आठवडय़ात ज्यांनी संसदेतील लोकशाहीची हत्या पाहिली त्यानंतर लोकशाहीसंदर्भात ‘हिंदुस्थानकडून शिका’ असे विधान करण्यास कोणीच धजावणार नाही. दिल्लीतील वास्तव्यात अनेक प्रमुख लोकांशी भेटीगाठी होत असतात. श्री. राहुल गांधी यांना भेटून चर्चा करण्याचा योग आला. ‘ये लोग हमें संसद में भी बोलने नहीं देते और मीडिया उनके साथ है!’ असे श्री. गांधी म्हणाले. करदात्यांच्या पैशांवर लोकसभा टी.व्ही. चालते, पण विरोधकांवर त्यांचा बहिष्कार आहे. श्री. कपिल सिब्बल यांच्या घरी सोमवारी रात्री विरोधी पक्षाला जेवण ठेवले होते. 2024 सालात एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही यावर सगळय़ांचे एकमत ठरले, पण श्री. कपिल सिब्बल यांच्यासारख्या कायदेपंडिताने त्या वेळी मतदान पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. ‘2024 च्या निवडणुकांतून ‘ईव्हीएम’ घालविल्याशिवाय यश मिळणार नाही. बॅलट पेपरवरच निवडणुका घेण्यासाठी लढायला हवे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही!’ श्री. सिब्बल हे हवेत बाण मारणारे नेते आणि वकील नाहीत. ‘ईव्हीएम’चा विषय मार्गी लावावाच लागेल. जेथे निवडणूक पद्धतीवरच सगळय़ांत मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे तेथे लोकशाही आणि संसदेवर काय बोलायचे? पुन्हा संसदेच्या आवारात आता महात्मा गांधीजी हे सर्व पाहायला हजर नाहीत. त्यांच्या भव्य पुतळय़ाचा नैतिक आधार सगळय़ांनाच होता. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाने तो गांधी पुतळाही मोठय़ा पत्र्याच्या आवरणाने झाकून ठेवला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे मंथन सुरू असताना न्याय संस्था, राज्य घटना आणि कायदा यांचे तेज कमी झाले आहे. ‘मार्शल लॉ’ पुकारून सरकार संसद चालवते. विरोधकांचे ऐकणे हा लोकशाहीत ज्यांना अपमान वाटतो त्यांच्या हाती देश व लोकशाही सुरक्षित नसते.
देशातील विमा कंपन्यांचे खासगीकरण करू नका असे सांगणारे विरोधक सरकारला शत्रू वाटतात. त्यांचा आवाज दाबण्यासाठी संसदेत मार्शलला बोलावून लोकशाहीचे वस्त्र्ाहरण केले जाते. हे स्वातंत्र्य कसले? लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविणे एवढय़ापुरतेच स्वातंत्र्य नसते. स्वातंत्र्याशी संबंधित सर्व संस्था आणि व्यवस्थाच मोडीत निघाल्या आहेत. याविरुद्ध लिहावे व बोलावे असे ज्यांना वाटते त्यांनी तुरुंगात जाण्याचे व पेगॅससद्वारा हेरगिरीचे भय बाळगू नये. त्याच भयमुक्ततेने ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा राहिला व देश स्वतंत्र झाला. त्याच स्वतंत्र हिंदुस्थानात देशाच्या संसदेत ‘मार्शल लॉ’ घुसवून विरोधकांची मुस्कटदाबी झाली!
शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी, राजकीय कार्यकर्ते असे सगळेच नव्या सूर्यकिरणांच्या प्रतीक्षेत आहेत!
स्वातंत्र्याचा पराभव झाला आहे काय?
@rautsanjay61
– [email protected]





























































