
सामना ऑनलाईन । माद्रिद
२००८ साली विक्रमी करारावर मँचेस्टर युनायटेडकडून रियाल माद्रिदमध्ये एण्ट्री… सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये ४५१ दे दणादण गोल… दोन ला लीगा तसेच चार चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर मोहोर… ही स्टोरी ख्रिस्तियानो रोनाल्डो व रियाल माद्रिद यांच्या घवघवीत यशाची. पण आता ही जोडगोळी तुटणार आहे. पोर्तुगालचा हा पठ्ठय़ा आगामी मोसमात इटलीतील युवेंटस् या क्लबमधून खेळणार असल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध झाले आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा रियाल माद्रिदच्या व्यवस्थापनावर नाराज होता. अशा प्रकारचे वृत्त वारंवार मीडियामधून प्रसिद्ध होत होते. अध्यक्ष फ्लोरेनटिनो पेरेज ब्राझीलचा स्ट्रायकर नेमार याला घेण्यासाठी मोर्चेबांधणी करताहेत. हे समजल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोची क्लब सोडण्याची इच्छा आणखीनच बळावली. आता युवेंटस् क्लबने त्याच्यासोबत करार केल्याचे वृत्त आले असले तरी अधिकृतपणे याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही.





























































