
सामना ऑनलाईन । कुडाळ
आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोंकण व गोवा राज्यातील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाशेजारी असलेल्या कलादालनात ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनासाठी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील ऋतिका विजय पालकर हिची निवड झाली आहे.
एस.बी. पोलाजी यांनी आजवर हिंदुस्थानसह रोम, पॅरिस, इटली, दोहा, कतार, स्वित्झर्लंड, ब्रुसेल्स अशा अनेक देशांत कोकणातील कलाकारांना नेऊन इथल्या कलेला प्रसिध्दी दिली आहे. त्यांनी चौदा वर्षे सिंधुदुर्ग व गोवा राज्यात रांगोळी प्रदर्शन व स्पर्धा तसेच सावंतवाडी येथील आर्ट गॅलरीत सहा वर्षे चित्रकला प्रदर्शन भरविले होते. दिल्लीतील प्रदर्शनास सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना आपल्या कलाकृतींसह पोलाजी यांच्या बांदा- वाफोली येथील घरी बोलविण्यात आले होते. यावेळी ऋतिकाने बनविलेल्या कलाकृती पाहून भारावून गेल्याचे पोलाजी यांनी सांगितले. ऋतिकाने तयार केलेली चित्रे नैसर्गिक वस्तूंपासून बनविल्याने तिची या प्रदर्शनात निवड झाली आहे. माणगाव येथील प्रसिध्द काष्ठशिल्पकार विजय पालकर यांची ती कन्या असून तिची निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
































































