
कांदिवली पश्चिम येथील ‘बालभारतीज मगनलाल जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयाचे नाव गुजराती भाषेत आहे. सर्व महाविद्यालयांची नावे ठळक मराठी अक्षरात दर्शनी भागात प्रवेशद्वारावर लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे आदेश असताना कांदिवलीच्या महाविद्यालयाने या आदेशाला हरताळ फासला आहे. याविरोधात युवासेना सिनेट सदस्य आक्रमक झाले असून त्यांनी महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठ संलग्नीत सर्व महाविद्यालयांनी त्यांची नावे ठळक मराठी अक्षरात दर्शनी भागात प्रवेशद्वारावर लावावी आणि 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस विविध चर्चासत्रे आणि कार्यक्रम घेऊन साजरा करावा असे आदेश मुंबई विद्यापीठाने दिले होते. तत्कालीन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मार्च 2022 मध्ये हे परिपत्रक जारी केले होते. मात्र ‘ बालभारतीज मगनलाल जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयाचे नाव अद्याप गुजराती भाषेत आहे. याविरोधात शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के यांनी मुंबई विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.
महाविद्यालयाला समज देणार
मार्च 2022 मधील परिपत्रक पुन्हा सर्व संलग्नीत महाविद्यालयांना पाठविण्यात यावे अशी आग्रही मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली. यानंतर डॉ. भामरे यांनी पुन्हा परिपत्रक काढण्याचे तसेच बालभारती महाविद्यालयाला समज देण्याचे आदेश दिले.






























































