मॅक्सवेल जखमी, आरसीबीच्या काळजात धस्स

इकडे ब्रिस्बेनमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळणाऱया ग्लेन मॅक्सवेलच्या पायाचे स्नायू पुन्हा दुखावले आहेत आणि तिकडे आरसीबीच्या काळजात धस्स झालं. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे आरसीबी चिंतेत आहेत. सध्या आरसीबीला मॅक्सवेलच्या फलंदाजीकडून खूप आशा आहेत. या खेळीदरम्यान जखमी झालेला मॅक्सवेल डगआऊटमध्ये बसून आपल्या पायाला बर्फ चोळत होता. एवढेच नव्हे तर तो पुढच्या सामन्यालाही मुकणार आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत मार्कस स्टॉयनिस मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व सांभाळेल. मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत मेलबर्न स्टार्स एका झंझावाती फलंदाजासह एका प्रभावी फिरकीवीरालाही मुकणार आहे. ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या सामन्यात 215 धावांचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सचे सारे स्टार्स 111 धावांतच निखळले आणि त्यांनी 103 धावांनी दारुण पराभव सहन करावा लागला.