
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या डब्यांमध्ये अचानक सरप्राइज धाडी टाकल्या जात आहेत. लोकलच्या डब्यांमध्ये अचानक आरपीएफचा संपूर्ण 27 जणांचा ताफा चढून सर्वांची चेकिंग केली जात आहे. त्यामुळे पाकीटमार तसेच भुरटय़ा चोरांवर अंकुश ठेवण्याबरोबरच अपंगांच्या डब्यातून खुशाल प्रवास करणारे धडधाकट प्रवासी तसेच फुकटे प्रवासी अलगद रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळय़ात सापडत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते विरारदरम्यान फुकटय़ांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने जोरदार मोहीम सुरू केली असून गेल्या आठवडय़ात 33 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
लोकलच्या महिलांच्या डब्यातून तसेच अपंगांच्या डब्यात सध्या रेल्वे सुरक्षा बलामार्फत सरप्राइज धाडी घातल्या जात आहेत. यावेळी महिलांच्या डब्यात कारवाई करण्यासाठी आरपीएफचे 15 लेडीज कॉन्स्टेबल, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या सात लेडीज स्टाफ आणि तिकीट तपासनीसांचा पाच जणांचा लेडीज स्टाफ असे 27 जणांचे ‘फ्लॅश चेक ड्राइव्ह’चे पथक खास त्यासाठी नेमण्यात आले आहे. बोरिवली ते विरारदरम्यान लोकलच्या महिला डब्यांमध्ये आलटून पालटून अचानक कारवाई केली जात आहे. यावेळी आरपीएफ राष्ट्रीय पातळीवरची हेल्पलाइन 182 संदर्भात प्रवाशांचे प्रबोधन करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी दिली.
दंडाची रक्कम वसूल
गेल्या आठवडय़ात 33 प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात येऊन 8190 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोकलच्या फुटबोर्डवरून आणि टपावरून प्रवास करणाऱया 5959 प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात येऊन ऑगस्टअखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार 18 लाख 70 हजार 309 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्पलाइनवर अफवा पसरवणारे पकडले जाणार
रेल्वे प्रवासात धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मदत मिळवून देणारी रेल्वे सुरक्षा दलाची देशपातळीवरील हेल्पलाइन 182 आता आणखी अत्याधुनिक होणार आहे. तसेच ही हेल्पलाइन व्यस्त राहणार नाही. एकावेळी अनेक कॉल अटेंड करण्याची सोय होणार आहे. शिवाय या हेल्पलाइनवर निनावी कॉल करणाऱयांना पकडणे सोपे जाण्यासाठी या हेल्पलाइनला जीपीएस आधारित जिओ फेन्सिंगची जोड देण्यात येणार आहे. प्रवाशांना त्यांनी कोणत्या ठिकाणाहून (स्थानकाजवळचे गाव) कॉल केला आहे हे सांगण्याची आता गरज राहणार नाही. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये आपत्कालीन वेळेत मदत मिळणे सोपे जाणार आहे. त्यामुळे कॉल कुठून आला याचे आकलन पटकन होऊन संबंधित ठिकाणी मदत पोहचविणे सोपे होणार आहे.


























































