2 वर्षांचे प्लानिंग, एक अ‍ॅप अन् 9 दिवसात 1400 कोटींची फसवणूक; चिनी व्यक्तीचा 1200 हिंदुस्थानींना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटच्या युगामध्ये सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत. अनेक गुन्हे उघड झाल्यानंतरही जास्त पैशांच्या हव्यासापोटी लोकं यात अडकतात आणि आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. गुजरातमध्येही अशाच एका डिजिटल फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका चिनी व्यक्तीने फुटबॉल बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून 1200 लोकांना तब्बल 1400 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 9 दिवसांमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वू उयानबे असे आरोपीचे नाव असून तो चीनच्या शेनझेन प्रांतामध्ये राहतो. दोन वर्ष तो हिंदुस्थानमध्ये वास्तव्यास होता. ‘दानी डेटा’ नावाचे अ‍ॅप बनवून गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील लोकांना गंडा घातला. जून 2022मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता.

उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्याच्या पोलिसांनी याचा तपास सुरू केल्यानंतर याचे धागेदोरे थेट उत्तर गुजरातपर्यंत पोहोचले. या कटामध्ये उत्तर गुजरातमधील काही लोकंही सहभागी असल्याचे उघड झाले. त्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपी वु उयानबे हा 2020 ते 2022 या काळात हिंदुस्थानमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले. गुजरातमधील पाटन आणि बनासकांठा जिल्ह्यामध्ये त्याने आपले जाळे पसरवले होते. स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून त्याने आपल्या कटात सहभागी करून घेतले होते. यानंतर मे 2022मध्ये त्याने एक फुटबॉल बेटिंग अ‍ॅप लॉन्च केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना जाळ्यात अडकवले.

आरोपीने 15 ते 75 वर्ष वयोगटातील लोकांना लक्ष्य केले होते. या अ‍ॅपच्या मदतीने तो दिवसाला 200 कोटी रुपये कमावत होता. अवघे 9 दिवस हे अ‍ॅप सुरू होते आणि त्यानंतर अचानक एक दिवस ते बंद झाले. अ‍ॅप बंद झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लोकांना समजले. मात्र तोपर्यंत आरोपी चीनला पळून गेला होता. गेल्या वर्षी हा प्रकार उघडकीस आला असला तरी आरोपी वू उयानबेविरुद्ध ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.