
आजारी मावशीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणास स्वस्तात औषधी मिळवून देण्याच्या बहाण्याने वशीकरण करून खिशातील 24 हजारांची रोख रक्कम हिसकावून पळ काढल्याची घटना एमजीएमसमोरील औषधी दुकानाजवळ घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपासाला सुरुवात केली आहे.
भोकरदन तालुक्यातील बालसावंगीमधील किरण नारायण गवळी (22) हा डी.जे. ऑपरेटर आहे. त्याची मावशी आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास किरण हा एमजीएम रुग्णालयाबाहेर उभा असताना त्या ठिकाणी तीन जण आले. त्यांनी ओळख दाखवत मैत्री केली. स्वस्त औषधी दुकान कुठे आहे, आम्हाला स्वस्तात औषधी मिळवून दे असे सांगितले. यावरून किरण हा त्यांच्यासोबत मोतीवालानगरात असलेल्या औषधी दुकानाजवळ गेला. वडापावच्या दुकानाजवळ नेऊन तिघांनी त्याच्यावर कुंकर मारून वशीकरण करत खिशातील 24 हजारांची रक्कम काढून पळ काढला.






























































